कोल्हापूर: बायोगॅस प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांना ६८.३० लाखांचा गंडा, अकरा जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 02:19 PM2022-08-18T14:19:53+5:302022-08-18T14:22:25+5:30

कोल्हापूर : कोते (ता. राधानगरी) येथे सीएनजी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याच्या नावाखाली जमीनमालक शेतकरी , डेपोधारक, मशीन खरेदीदार व ...

68.30 lakh fraud of farmers in the name of biogas project, crime against eleven persons | कोल्हापूर: बायोगॅस प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांना ६८.३० लाखांचा गंडा, अकरा जणांवर गुन्हा

कोल्हापूर: बायोगॅस प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांना ६८.३० लाखांचा गंडा, अकरा जणांवर गुन्हा

googlenewsNext

कोल्हापूर : कोते (ता. राधानगरी) येथे सीएनजी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याच्या नावाखाली जमीनमालक शेतकरी, डेपोधारक, मशीन खरेदीदार व १८० ट्रॅक्टरधारकांची सुमारे ६८ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी महाडिक कॉलनीतील स्टार ॲग्रो तसेच स्टार बिझनेस ॲडव्हायझर्स प्रा. लि. कंपनीच्या ११ जणांवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. याबाबत राजू लाला कवाळे (वय ५२, रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये राहुल तानाजी कांबळे, आरती बलभीम कांबळे (दोघेही रा. राशिवडे बु., ता. राधानगरी), मंजुनाथ हिरेमठ, रवींद्र हिरेमठ (दोघेही रा. बैलहुंगल, जि. बेळगाव), सचिन विभुते, शिवाजी विभुते (दोघेही रा. कोते, ता. राधानगरी), ओंकार मोरे (रा. टोप संभापूर, ता. हातकणंगले), मकरंद सूर्यवंशी, विक्रम भागोजी, गजानन परीट (तिघेही रा. गजानन नगर, मंगळवार पेठ), गजानन कांबळे (रा. शेळकेवाडी, ता. राधानगरी) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोते (ता. राधानगरी) येथे सीएनजी बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी स्टार ॲग्रो तसेच स्टार बिझनेस ॲडव्हायझर्स प्रा. लि. कंपनीचे संशयित आरोपी राहुल कांबळेसह इतरांनी राजू कवाळे यांची फेब्रुवारी २०२२मध्ये भेट घेतली. प्रकल्प उभारण्यासाठी कवाळे यांच्याकडून कोते येथील साडेसहा एकर शेतजमीन वार्षिक चार लाख रुपये भाड्याने घेतली. त्यांना कामासाठी डेपोमध्ये घेणाऱ्यांना व शेणापासून लाकूड बनविण्याचे मशीन घेण्यासाठी एकूण ४८ लाख ५० हजारांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

डेपोधारकांना प्रतिटन कच्च्या मालामागे २५० रुपये देण्याचे व शेणापासून लाकूड बनविण्याचे मशीनधारकाला प्रतिमहा १७ ते २० हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. १८० ट्रॅक्टरधारकांना प्रत्येकी ११ हजार रुपये असे एकूण १९ लाख ८० हजार रुपये डिपॉझिट म्हणून गुंतविण्यास भाग पाडले. त्यांना दिवसामागे १,३५० रुपये परतावा देण्याचे आमिष दाखविले. पण कोणालाही परतावा दिला नाही. त्यामुळे या सर्वांची एकूण ६८ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार राजू लाला कवाळे यांनी मंगळवारी रात्री उशिरा शाहुपुरी पोलीस ठाण्यात दिली.

Web Title: 68.30 lakh fraud of farmers in the name of biogas project, crime against eleven persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.