नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची ६५ टक्के उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST2021-02-05T06:56:17+5:302021-02-05T06:56:17+5:30
शासनाच्या सूचनेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारी करून जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी दि. २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते ...

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची ६५ टक्के उपस्थिती
शासनाच्या सूचनेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारी करून जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी दि. २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. टप्प्याटप्प्याने सुरू होणाऱ्या शाळा आणि त्यामधील विद्यार्थ्यांची संख्या वाढली. जिल्ह्यामध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या एकूण १०५४ शाळा आणि त्यामधील एकूण विद्यार्थी संख्या २,२४,४४३ इतकी आहेत. त्यापैकी ९७५ शाळांमध्ये प्रत्यक्षात वर्ग सुरू झाले आहेत. त्यातील उपस्थित विद्यार्थी संख्या १,४४,९१९ आहे. शाळा सुरू करण्यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत करवीर, पन्हाळा आणि शिरोळ तालुका आघाडीवर आहे. कोरोनाबाबतची भीती असल्याने अद्याप ३५ टक्के विद्यार्थी वर्गामध्ये येत नाहीत. त्यात अधिकतर नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या समावेश आहे. त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला आहे. शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी, पालकांच्या मागणीनुसार ग्रामीण भागातील अनेक शाळांनी इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग गेल्या महिन्यात सुरू केले आहेत. त्यामुळे शाळांचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला आहे.
चौकट
एकही विद्यार्थी संक्रमित नाही
जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. या वर्गांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. मात्र, एकही विद्यार्थी संक्रमित झाला नसल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून शाळांनी वर्ग भरविले आहेत. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या दक्षतेच्या सर्व उपाययोजना शाळांनी केल्या आहेत. त्याचा शिक्षण विभागाकडून आढावा घेतला जात आहे. डिसेंबर अखेरच्या आकडेवारीनुसार एकूण ६५ टक्के विद्यार्थी वर्गात उपस्थित असल्याचे लोहार यांनी सांगितले.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या शाळा : १०५४
वर्ग सुरू असणाऱ्या शाळा : ९७५
एकूण विद्यार्थी संख्या : २२४४४३
वर्गात उपस्थित असणारे विद्यार्थी : १४४९१९