'कोल्हापुरातील पंचगंगा पुलाजवळ कमानीच्या पुलासाठी ४०० कोटी लागणार', पूरग्रस्तांचे उपोषण 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 01:15 PM2023-12-11T13:15:13+5:302023-12-11T13:24:22+5:30

राष्ट्रीय महामार्गासाठी पंचगंगा पुलाजवळ टाकण्यात येणाऱ्या भरावाचे काम थांबवले

'400 crore will be required for the arch bridge near Panchganga Bridge in Kolhapur' | 'कोल्हापुरातील पंचगंगा पुलाजवळ कमानीच्या पुलासाठी ४०० कोटी लागणार', पूरग्रस्तांचे उपोषण 

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गासाठी पंचगंगा पुलाजवळ टाकण्यात येणाऱ्या भरावाऐवजी कमानीचा पूल करण्याबाबत केंद्र सरकारकडून सूचना आल्या आहेत, त्यामुळे भराव टाकला जाणार नाही, असे आश्वासन देत, यासाठी अतिरिक्त ४०० कोटी लागणार असल्याचे रविवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपमुख्य अभियंता गोविंद बैरवा यांनी सांगितले. याबाबत, पूरग्रस्त समितीच्या वतीने पंचगंगा पुलाजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.

सहा पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जाेरात सुरू आहे. पंचगंगा पुलानजीक मातीचा भराव टाकून रस्त्याचे काम केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. तरीही संबंधित विभागाने दाद न दिल्याने पूरग्रस्त समन्वयक समितीचे प्रमुख बाजीराव खाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत काम थांबवण्याची मागणी केली होती. काम थांबवले नाहीतर रविवारी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार, पंचगंगा पुलानजीक बाजीराव खाडे यांच्या नेतृत्वाखाली पूरबाधित गावातील लोकप्रतिनिधी उपोषणाला बसले होते.

बाजीराव खाडे म्हणाले, महापुराच्या वेळी जिल्ह्यातील गावांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. हा भराव टाकला तर गावेच्या गावे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करावा.

आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे म्हणाले, पूरबाधित क्षेत्रात खासगी अथवा सार्वजनिक कामे करता येत नाहीत, हा नियम आहे. कमानीचा पूल करण्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा अधिक नुकसान दरवर्षी बाधित गावातील होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपमुख्य अभियंता गोविंद बैरवा म्हणाले, भराव टाकण्याचे काम बंद करत असल्याचे पत्र यापूर्वीच दिलेले आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरून सूचना आलेल्या आहेत. शिरोली ते रेल्वे उड्डाणपूलपर्यंत कमानी उभ्या कराव्या लागणार असून, यासाठी अंदाजे ४०० कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव येत्या आठ-दहा दिवसांत सरकारकडे पाठवला जाणार आहे. तो तातडीने मंजूर करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत.

यावेळी मिलिंद श्रीराव, पाडळी बुद्रूकचे सरपंच शिवाजी गायकवाड, प्रयाग चिखलीचे सरपंच रोहित पाटील, शिरोली पुलाचीच्या सरपंच पद्मजा करपे, शियेच्या सरपंच शीतल मगदूम, सांगरुळच्या सरपंच शीतल खाडे, उपसरपंच उज्ज्वला लोंढे, शिरोली दुमालचे सरपंच सचिन पाटील, पाडळी खुर्दचे सरपंच नानाजी पालकर, ‘गोकूळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. एच. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, हंबीरराव वळके आदी उपस्थित होते.

Web Title: '400 crore will be required for the arch bridge near Panchganga Bridge in Kolhapur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.