Kolhapur: टोपमधील ३७ विनापरवाना क्रशर सील, सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करताच 'महसूल'ची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:55 IST2025-07-11T11:55:32+5:302025-07-11T11:55:55+5:30
अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले

Kolhapur: टोपमधील ३७ विनापरवाना क्रशर सील, सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करताच 'महसूल'ची कारवाई
शिरोली : हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडी येथे बेकायदेशीररीत्या सुरू असलेले ३७ क्रशर व्यावसाय सील करून तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरुवारी दिवसभर धडक कारवाई केली.
बुधवारी (दि. ९) आमदार सतेज पाटील यांनी टोप-कासारवाडी परिसरातील अवैध उत्खनन व शासनाकडे जमा होणारा महसूल याबाबतचा तारांकित प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला होता. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाचा महसूल चुकवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये गुरुवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यावर टोप, कासारवाडी येथील खाण व क्रशर व्यवसाय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
मंत्री बावनकुळे यांनी अनधिकृत उत्खनन करणाऱ्या दगड खाणी, क्रशरवर कारवाई करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हातकणंगले तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी सीमा मोरया, पांडुरंग धुमाळ, अमित लाड, सचिन कांबळे, अमोल कोटे यांच्या पथकाने धडक क्रशर सिलची कारवाई केली.
वाचा- होय..! हेलिकॉप्टर घेतलंय; रॉयल्टी बुडवून नाही तर कर्ज काढून; सतेज पाटलांच्या आरोपानंतर व्यावसायिकाने दिले स्पष्टीकरण
टोप आणि कासारवाडी येथील ४६ पैकी ३७ व्यावसायिकांनी ट्रेडिंग परवानाच काढलेला नाही. तसेच कित्येकांच्याकडे प्रदूषण महामंडळाचे परवानगी पत्रच नाही. दगड उत्खनन करणाऱ्या अनेकांनी राॅयल्टी भरलेली नाही, कित्येक जण विनापरवाना, विनाराॅयल्टी उत्खनन करत आहेत अशांवर कारवाई सुरू करून हे क्रशर सील केले आहेत, असे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले
अनधिकृत दगड खाण व क्रशरवर प्रशासनाने कारवाई केल्यानंतर मोठी हालचाल पाहायला मिळाल्या. कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी डंपर, जेसीबी, पोकलेनसारखी अवजड यंत्रसामग्री इतरत्र हलवली. या धाडसी कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी गुरुवारी सकाळी १० वाजता मंडलाधिकारी तलाठी कोतवाल यांना विनापरवाना आणि अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश दिले त्यानुसार गुरुवारी दिवसभर टोपमधील ३७ क्रशरवर कारवाई करण्यात आली.
तहसीलदार यांच्या आदेशानुसार, ज्या क्रशर व्यवसायिकांकडे ट्रेडिंग लायसन प्रदूषण महामंडळाचा परवाना बिगर शेती रॉयल्टी भरलेली नाही अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून, टोपमधील ४६ पैकी ३७ व्यावसायिक परवाना नाही तर ९ जणांकडे परवाना आहे. - सीमा मोरया, मंडलाधिकारी