कोल्हापूर जि.प.चे २१ पैकी २० अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे; भाजपला एकदा लॉटरी, शिवसेनेची अद्याप पाटी कोरी

By समीर देशपांडे | Updated: July 8, 2025 18:34 IST2025-07-08T18:33:19+5:302025-07-08T18:34:32+5:30

मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा आमदार विनय कोरे यांना सोबत घेऊन वरचष्मा

20 out of 21 presidents of Kolhapur ZP belong to Congress NCP; BJP wins once, Shiv Sena still has empty slate | कोल्हापूर जि.प.चे २१ पैकी २० अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे; भाजपला एकदा लॉटरी, शिवसेनेची अद्याप पाटी कोरी

कोल्हापूर जि.प.चे २१ पैकी २० अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे; भाजपला एकदा लॉटरी, शिवसेनेची अद्याप पाटी कोरी

समीर देशपांडे

कोल्हापूर : आतापर्यंत २१ जणांनी कोल्हापूरजिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. यातील २० अध्यक्ष हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे होते. २०१९ साली शौमिका महाडिक यांच्या रूपाने भाजपने पहिला अध्यक्ष केला; परंतु एकाचवेळी जिल्ह्यातून सहा आमदार निवडून देणाऱ्या तत्कालीन शिवसेनेला अजूनही अध्यक्षपदाला गवसणी घालता आलेली नाही. यंदा शिंदेसेनेचे हे उद्दिष्ट असेल. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर प्रामुख्याने ही जबाबदारी असेल.

दिनकरराव यादव, बाळासाहेब माने, दिनकरराव मुद्राळे, बाबासाहेब पाटील-सरूडकर, शंकरराव पाटील-कौलवकर, शामराव पाटील-कोडोलीकर, प्रकाश आनंदराव पाटील, बाबूराव हजारे, नंदाताई पोळ हे सर्व १९९८ पर्यंतचे अध्यक्ष काँग्रेसचे होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पुष्पमाला जाधव, रामचंद्र गुरव, आण्णासाहेब नवणे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले.

तर नंतर पुन्हा डी. सी. पाटील, नानासाहेब गाठ, यशोदा कोळी, संजय मंडलिक, उमेश आपटे, विमल पाटील, बजरंग पाटील, राहुल पाटील यापैकी गाठ वगळता सर्व काँग्रेसचे अध्यक्ष होते. प्रत्येक वेळी पाठिंबा देणारे बदलत राहिले; परंतु गेल्या २० वर्षांत मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी हातात हात घालून गरज पडेल तेव्हा आमदार विनय कोरे यांना सोबत घेऊन दोन्ही काँग्रेसचा वरचष्मा ठेवला होता.

दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या महायुतीमुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने २०१९च्या निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे या निवडणुकीत उतरला होता. महादेवराव महाडिक यांनी गरज पडेल त्या ठिकाणी त्यांच्या ताराराणी आघाडीचेही उमेदवार उभे केले होते. अमल महाडिक यांना या अध्यक्षपदाने दिलेली हुलकावणी महाडिक यांना बोचली होती. त्यामुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवायचे, यासाठी जोडण्या घातल्या होत्या. परिणामी, शौमिका यांचे नाव पुढे आले आणि व्हायचा तोच परिणाम झाला.

भाजपच्या शौमिका यांना अध्यक्ष करण्यासाठी ऐन मतदानावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही सदस्य गैरहजर राहिले. अपक्ष एका महिला सदस्यानेही महाडिक यांना पाठिंबा दिला आणि भाजपचा पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा मान शौमिका यांना मिळाला. परंतु हेच गणित नंतर बदलले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता, त्यातील अनेकजण प्रामुख्याने शिवसेनेचे सदस्य काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले आणि पुन्हा अध्यक्ष करण्यात काँग्रेसला यश आले.

गणित जमले तर शिंदेसेनेला संधी

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय चित्र बघितले तर शिंदेसेनेला अध्यक्षपदाची संधी मिळू शकते. फक्त कागदावरची गणिते सत्यात उतरली पाहिजेत. कारण पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे मातब्बर शिंदेसेना नेते किती सदस्य निवडून आणतात, त्यावर गणित अवलंबून असेल.

जागावाटप कळीचा मुद्दा

महायुतीमध्येच अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. चंदगड, भुदरगड, राधानगरी, शिरोळ, हातकणंगले या ठिकाणी अशा लढती होण्याची शक्यता आहे. याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. त्यामुळे महायुतीमधील जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. जमेल तिथे एकत्र नाहीतर स्वतंत्र असा महायुतीचा बाणा सध्या दिसत आहे.

गत सभागृहातील बलाबल
काँग्रेस - १४
भाजप - १४
राष्ट्रवादी - ११
शिवसेना - १०
जनसुराज्य - ०६
ताराराणी आघाडी महाडिक - ०३
ताराराणी आघाडी आवाडे - ०२
स्वाभिमानी शेतकरी संघटना - ०२
शाहू आघाडी आबिटकर - ०२
युवक क्रांती आघाडी कुपेकर - ०२
अपक्ष - ०१
एकूण - ६७

२१ पैकी १६ अध्यक्ष काँग्रेसचे

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस किती बळकट होती, याचे उत्तम उदाहरण म्हणून अध्यक्षपदाकडे पाहावे लागेल. जिल्हा परिषद स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या २१ अध्यक्षांपैकी तब्बल १६ अध्यक्ष काँग्रेसचे झाले. तर ४ राष्ट्रवादीचे झाले. केवळ एकदाच भाजपला संधी मिळाली.

Web Title: 20 out of 21 presidents of Kolhapur ZP belong to Congress NCP; BJP wins once, Shiv Sena still has empty slate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.