Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात पालिका १३, आघाड्या २८; पक्षांच्या चिंधड्या, पक्षांची चिन्हे झाली गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 19:20 IST2025-11-26T19:19:11+5:302025-11-26T19:20:18+5:30
जयसिंगपूरमध्ये भाजपसोबत, शिरोळात विरोधात : गडहिंग्लजमध्ये भाजप-शिंदेसेनाला हात देणारी काँग्रेस हातकणंगलेत स्वबळावर

Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात पालिका १३, आघाड्या २८; पक्षांच्या चिंधड्या, पक्षांची चिन्हे झाली गायब
कोल्हापूर : जिल्ह्यातील तेरा नगरपालिका, नगरपंचायतींसाठी नेत्यांनी स्थानिक सोयीच्या २८ आघाड्या झाल्याने राजकीय पक्षांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या आहेत. ‘जयसिंगपूर’मध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांसोबत असणारी भाजपचा शिरोळात सवता सुभा आहे. गडहिंग्लजमध्ये भाजप-शिंदेसेनेला हात देणाऱ्या काँग्रेसने इतर ठिकाणी त्यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून राज्याच्या राजकारणाचे चित्र बदलत गेले. पारंपरिक आघाड्या, युतीमध्ये मोडतोड झाली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सरळ सामना झाला. जिल्ह्याचा विचार करायचा म्हटले तर लोकसभेला कोल्हापूरकरांनी आघाडी आणि महायुतीला समान संधी दिली. सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र, आघाडीचा सुफडा साफ करताना एकतर्फी महायुतीच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर वर्षभराने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. जिल्ह्यातील तेरा नगरपालिका व नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होत आहे.
‘जयसिंगपूर’मध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, भाजपचे सावकार मादनाईक यांच्या आघाडीला उद्धवसेनेने पाठिंबा दिला आहे. तेच भाजप शिरोळात मात्र आमदार पाटील यांच्याविरोधात असून, ‘जनसुराज्य’चे आमदार अशोकराव माने यांच्या सोबत एकत्र आली आहे. येथे आमदार पाटील-यड्रावकर यांच्या मदतीने शिंदेसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील आले आहेत.
‘गडहिंग्लज’मध्ये काँग्रेस, शिंदेसेना, भाजप एकत्र आहेत, तर ‘हुपरी’ व ‘मूरगूड’, ‘चंदगड’मध्ये भाजप, शिंदेसेना एकदिलाने लढत आहे, मात्र हेच पक्ष हातकणंगलेमध्ये एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत.
‘आजरा’त शिंदेसेना, भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवसेनेने आव्हान उभे केले आहे. मूरगूडमध्ये शिंदेसेना व भाजपच्या आघाडी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आहे. कागलात राष्ट्रवादी काँग्रेस व समरजीत घाटगे गटाच्या आघाडीसमोर शिंदेसेना उभी आहे.
पन्हाळ्यात जनसुराज्य पक्षासमोर अपक्षांनीच आव्हान उभे केले आहे. मलकापूरमध्ये जनसुराज्य, भाजप, दलिम महासंघाच्या आघाडीच्या विरोधात उद्धवसेना, राष्ट्रवादी काँगेस व शेकाप एकत्र आले आहे. पेठ वडगाव मध्ये जनसुराज्य, ताराराणी आघाड्यासमोर यादव पॅनलने आव्हान उभे केले आहे. चंदगडमध्ये भाजप, शिंदेसेना एकत्र असून, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनी साथ दिली आहे.
पक्षांची चिन्हे झाली गायब
आपल्या पक्षांचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येण्यासाठी प्रत्येक राजकीय नेत्यांची धडपड सुरू असते. त्यातही पक्षाच्या चिन्हावरील उमेदवारांना खूप महत्त्व असते. पण, सोयीच्या आघाड्यांच्या नादात पक्षांची चिन्हे गायब झाली आहेत. अपवादवगळता बहुतांशी ठिकाणी आघाड्यांच्या चिन्हांवरच उमेदवार रिंगणात आहेत.
पक्ष झाले उदंड...
या निवडणुकीत नगरपालिका व नगरपरिषद कार्यक्षेत्रात ताकद असणारे आठहून अधिक राजकीय पक्ष आहेत. या निवडणुकीत पक्ष उदंड झाल्याने इच्छुकांना पक्षीय ताकद मिळाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, जनसुराज्य, जनता दल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष या निवडणुकीत सक्रिय आहेत.
नेते मंडळी हो भाषण जरा जपूनच
सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू असून, सकाळी एका नगरपालिकेत, दुपारी दुसऱ्या, तर सायंकाळी तिसऱ्या ठिकाणी प्रचारसभा नेत्यांना घ्याव्या लागत आहेत. प्रत्येक ठिकाणी कोण कोणासोबत आहे, हे नेत्यांनाही समजत नसल्याने भाषणाअगोदर आघाड्यातील घटक पक्षांची माहिती घेऊन टीका कोणावर करायची? याची माहिती नेत्यांना घ्यावी लागत आहे.