Kolhapur: विनयभंग प्रकरणी प्राध्यापक जोशीच्या विरोधात १२ विद्यार्थिनींच्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 11:57 IST2026-03-09T11:56:46+5:302026-03-09T11:57:27+5:30
सात विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले, घरझडती घेणार; महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत

Kolhapur: विनयभंग प्रकरणी प्राध्यापक जोशीच्या विरोधात १२ विद्यार्थिनींच्या तक्रारी
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. प्राध्यापक सौरभ संजय जोशी (वय ३०, रा. बाबूजमाल दर्ग्याजवळ, कोल्हापूर) याने गैरवर्तन केल्याचे एकूण १२ तक्रार अर्ज विद्यार्थिनींनी गोकुळ शिरगाव पोलिसांना दिले. यातील सात विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले असून, अटकेतील जोशीच्या घराची झडती घेतली जाईल, अशी माहिती करवीर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी दिली.
वारंवार फोन आणि मेसेज करून विद्यार्थिनींना केबिनमध्ये बोलवून विनयभंग करणारा प्रा. जोशी याला गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात एकूण १२ विद्यार्थिनींनी उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्याकडे तक्रार अर्ज दिले आहेत. विद्यार्थिनींना मुद्दाम केबिनमध्ये बोलवून घेणे, त्यांच्याशी लगट करणे, मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवण्याचे प्रकार त्याने केले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.
पोलिसांनी सात विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले असून, त्यांना साक्षीदार केले आहे. गरज पडल्यास इतर विद्यार्थिनींचेही जबाब नोंदवले जाणार आहेत. त्याच्या विरोधातील पुरावे गोळा करण्यासाठी त्याच्या घराची झडती घेतली जाणार आहे. त्याचा मोबाइल जप्त केला असून, लॅपटॉपही जप्त केला जाईल, अशी माहिती उपअधीक्षक क्षीरसागर यांनी दिली.
महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत
गोकुळ शिरगाव येथील महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे अटकेतील प्राध्यापकाच्या विरोधातील पुरावे जमा करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. कॉलेज परिसरासह इमारतींमध्ये आणि प्राध्यापकांच्या केबिनमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावावाते, अशी सूचना पोलिसांनी केली आहे.