उल्हासनगर महापालिका स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोर्चेबांधणीला वेग, दिग्गजांची धडधड वाढली!
By सदानंद नाईक | Updated: April 21, 2026 17:54 IST2026-04-21T17:53:35+5:302026-04-21T17:54:56+5:30
उल्हासनगर महापालिका निवडणुकीनंतर एका महिन्याच्या आत स्वीकृत नगरसेवकांची निवड होणे नियमानुसार अपेक्षित असते.

उल्हासनगर महापालिका स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोर्चेबांधणीला वेग, दिग्गजांची धडधड वाढली!
- सदानंद नाईक
लोकमत न्यूक न्यूज
उल्हासनगर : महापालिकेच्या स्थायी समिती आणि विशेष समिती सभापतींच्या निवडी निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर, आता सर्वांच्या नजरा स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीकडे लागल्या आहेत. या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीनंतर एका महिन्याच्या आत स्वीकृत नगरसेवकांची निवड होणे नियमानुसार अपेक्षित असते. मात्र, अद्याप ही प्रक्रिया सुरू झालेली नाही. याबाबत महापौर अश्विनी निकम यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश प्राप्त होताच स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात केली जाईल. महापालिका नियमानुसार या पदावर डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते किंवा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना संधी मिळणे अपेक्षित असते. मात्र, सध्याचे चित्र पाहता पक्षहितासाठी पराभूत उमेदवार, बडे ठेकेदार आणि व्यावसायिक यांची वर्णी लावण्यासाठी हालचाली सुरू आहेत. यामुळे प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
पक्षीय बलाबल आणि जागांचे गणित
उल्हासनगर महापालिकेच्या एकूण ७८ निर्वाचित सदस्यांच्या संख्याबळानुसार, ७ स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. शिंदेसेनेकडे ऐकून ३८ नगरसेवक असल्याने त्यांचे ०४ तर भाजपचे ऐकून ३७ नगरसेवक ३७ असल्याने ३ स्वीकृत नगरसेवक निवडून जाणार आहेत.
इच्छुकांची लांबलचक रांग: कोणाचे नाव चर्चेत?
दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये या पदासाठी तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने खालील नावांची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. शिंदे सेनेकडून पंचम कलानी, मनोज लासी, जीवन इदनानी, रमेश चव्हाण, मनीषा भानुशाली, वंचित पक्ष प्रतिनिधी, राम चार्ली, विक्की भुल्लर, कैलास तेजी आणि राजू माने. माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, धनंजय बोडारे, प्रेम झा, कपिल अडसूळ, राकेश पाठक आणि नरेंद्र राजांनी आदिची नवे चर्चेत आहेत.
निष्ठावंतावर अन्याय
एकीकडे पक्षासाठी निष्ठा वाहणाऱ्या पराभूत उमेदवारांचे पुनर्वसन करण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे, तर दुसरीकडे शहराच्या विकासासाठी तज्ज्ञ व्यक्तींना संधी देण्याची मागणी होत आहे. आता पक्षाचे 'वरिष्ठ' कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालतात आणि कोणाचा पत्ता कट होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.