ऐरोली-कटाई नाका प्रकल्पाच्या कामात मोठा विलंब; ९०% काम पूर्ण, पण उर्वरित ६ महिने का लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:26 IST2025-10-04T11:24:30+5:302025-10-04T11:26:48+5:30
कल्याण - डोंबिवली - नवी मुंबई भागातील प्रवास जलद होण्यासाठी आणखी सहा महिने जाणार आहेत.

ऐरोली-कटाई नाका प्रकल्पाच्या कामात मोठा विलंब; ९०% काम पूर्ण, पण उर्वरित ६ महिने का लागणार?
मुंबई : कल्याण - डोंबिवली - नवी मुंबई भागातील प्रवास जलद होण्यासाठी आणखी सहा महिने जाणार आहेत. हे अंतर वाहतूककोंडीशिवाय सुसाट पार करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ऐरोली कटाई नाका प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी मार्च २०२६ उजाडणार आहे. तोपर्यंत वाहन चालकांना कोंडीतून प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. आता एप्रिल २०२६ मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे.
एमएमआरडीएने ऐरोली कटाई नाका या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १२.३ किमी इतकी आहे. या मार्गामुळे कल्याण - डोंबिवली आणि नवी मुंबईमधील अंतर ७ किमीने कमी होईल. त्यातून या भागातील प्रवासाच्या वेळेत १५ मिनिटांनी बचत होणार आहे. या पहिल्या दोन टप्प्याचे काम यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणार होते. मात्र याला आता मोठा विलंब झाला आहे.
सध्या ठाणे- बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ या मार्गाचे सुमारे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये दोन स्वतंत्र बोगद्यांचा समावेश आहे. हे दोन्ही बोगदे खणून पूर्ण झाले आहेत.
कसा आहे प्रकल्प ?
पहिल्या टप्प्यात ३.४३ किमी लांबीचा मार्ग ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ या दरम्यान उभारला जात आहे. यात १.६९ किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात २.५७ किमी लांबीचा मार्ग ऐरोली पूल ते ठाणे बेलापूर रस्ता असा उभारला जात आहे. तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ येथून दिवा - पनवेल रेल्वे ओलांडून कल्याण शिळ रस्त्यावरील कटाई नाका कटाई नाका जंक्शनला जोडला जाणार आहे. हा मार्ग ६.७१ किमी लांबीचा असेल.
ऐरोली खाडी पूल ते ठाणे बेलापूर ९० टक्के कामे पूर्ण
दुसऱ्या टप्प्यात मुलुंड ऐरोली खाडी पूल ते ठाणे बेलापूर रोड या दरम्यान उन्नत रस्त्याची उभारणी सुरू आहे. सुमारे ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उन्नत मार्गाचे सेगमेंट लिफ्टिंग, तसेच रस्ता दुभाजक, संरक्षक कठड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे ओव्हरब्रिजमधील स्टील गर्डर बसविणे पूर्ण झाले असून डेक स्लॅब काम प्रगतीपथावर आहे. पावसाळ्यानंतर उड्डाणपुलावरील डांबरीकरण, विद्युत दिव्यांचे खांब बसविणे, ध्वनिरोधक पॅनेल बसविणे आदी कामे करण्यात येणार आहे. या मार्गाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.