अंबरनाथमध्ये सर्वच पक्ष सत्तेत, नगरपालिकेत विरोधी पक्षाविना होणार कामकाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 07:58 IST2026-05-18T07:57:53+5:302026-05-18T07:58:03+5:30
सत्ता समीकरणात शिंदेसेना आणि भाजप यांच्यात टोकाचे वाद निर्माण झाले होते. निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणारे शिंदेसेना आणि भाजप यांच्यातील वाद निवडणूक संपल्यानंतरदेखील थांबले नव्हते.

अंबरनाथमध्ये सर्वच पक्ष सत्तेत, नगरपालिकेत विरोधी पक्षाविना होणार कामकाज
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेतील सत्तासंघर्षावर पडदा पडला आहे. एकमेकांच्या विरोधात कूटनीती करणारे भाजप आणि शिंदेसेना एकत्रित नांदणार असल्याने अंबरनाथ नगरपालिकेत आता विरोधी पक्षच नसणार आहे.
सत्ता समीकरणात शिंदेसेना आणि भाजप यांच्यात टोकाचे वाद निर्माण झाले होते. निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणारे शिंदेसेना आणि भाजप यांच्यातील वाद निवडणूक संपल्यानंतरदेखील थांबले नव्हते. शिंदेसेनेला बाजूला सारत सत्ता स्थापनेचा भाजपचा प्रयत्न काहीसा फसल्यानंतर हे सर्व प्रकरण न्यायालयीन वादात अडकले. सर्वसाधारण सभेतही विरोध केला. मात्र, संघर्षातून साध्य होत नसल्याचे लक्षात येताच दोन्ही पक्षांनी युतीच्या अनुषंगाने बोलणी करून ती यशस्वी केली आहे.
असा ठरला युतीचा फॉर्म्युला
आधी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे बैठक घेऊन युतीचा फॉर्म्युला निश्चित केला, तर रविवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दुसरीकडे, काँग्रेसने निलंबित केलेले १२ नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्या
१२ नगरसेवकांसोबतही चव्हाण यांनी बैठक घेऊन युतीतील सहभागाचा फॉर्म्युला निश्चित केला.
५९ नगरसेवक आले निवडून
निवडणुकीच्या निकालात शिंदेसेनेच्या वाट्याला २७, भाजपच्या वाट्याला १४, काँग्रेस १२, राष्ट्रवादी (अजित पवार) चार आणि दोन अपक्ष असे ५९ नगरसेवक निवडून आले होते.
सत्तेचे झाले वाटेकरी
सभापतिपदाच्या निवडणुकीसाठीच्या संख्याबळाचे गणित जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित राहिल्यामुळे कामकाज ठप्प झाले होते. मात्र, आता शिंदेसेना आणि भाजप सोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार)
आणि अपक्ष असे सर्व नगरसेवक सत्तेचे वाटेकरी
झाले आहेत.