मुंबई-पुणे कनेक्ट लिंक प्रकल्पानंतर UHPFRC या आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्याणमध्येही वापर
By मुरलीधर भवार | Updated: May 5, 2026 15:34 IST2026-05-05T15:32:44+5:302026-05-05T15:34:47+5:30
स्टेशन परिसरातील उड्डाणपूलाच्या गर्डरचे करण्यात आले लॉन्चिंग

मुंबई-पुणे कनेक्ट लिंक प्रकल्पानंतर UHPFRC या आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्याणमध्येही वापर
कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसराचा विकास प्रकल्प राबविला जात आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस चौक ते बैलबाजार दरम्यान उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पूलासाठी मलेशियाच्या 'अल्ट्रा-हाय परफॉर्मन्स फायबर रीइन्फोर्ड फोर्ड काँक्रीट अर्थात यूएचपीएफआरसी या जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या पूलाचे काही गर्डर सोमवारी रात्री टाकण्यात आले. मुंबई-पुणे एक्सप्रेस 'मिसिंग लिंक प्रकल्पात यूएचपीएफआरसी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्टेशन परिसर विकास हा प्रकल्प महत्वकांक्षी प्रकल्प आहे. हा उड्डाणपूलामुळे स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.
हे गर्डर भल्या मोठ्या क्रेनच्या सहाय्याने बसविताना महापौर हर्षाली चाैधरी, आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंत्या अनिता परदेशी आणि प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्या रोहणी लोकरे आदी उपस्थित होते. उड्डाणपूलाची लांबी ११२५ मीटर आहे. रुंदी १८ ते ९ मीटर आहे. पूलाच्या कामासाठी मुंबई आयआयटी यांच्याकडून स्ट्रक्चरल डिझाईन प्रुफ चेकिंग करुन घेण्यात आले आहे. स्टेशन परिसरातील सध्या अस्तित्वात असलेला पादचारी पूल उड्डाणपूलाच्या कामाकरीता पाडावा लागणार होता. परंतू स्टेशन परिसरात पादचारी पूलाचा वापर करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने,पादचारी पूल पाडणे योग्य नव्हते. त्यामुळे स्टेशन समोरील परिसरात यूएचपीएफआरसी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून काल मध्यरात्री गर्डर लॉन्चिंग करण्यात आले.
यूएचपीएफआरसी तंत्रज्ञानाने करण्यात येणारे काँक्रीट पारंपारिक काँक्रीटपेक्षा कित्येक पटीने अधिक मजबूत आणि लवचिक असते. हे सिमेंट, सिलिका फ्युम, विशेष प्रकारचे स्टील फायबर्स आणि रसायनांचे मिश्रण करून तयार केले जाते, हे तंत्रज्ञान काँक्रीटला स्टीलसारखी मजबुती प्रदान करते. याची संकुचन शक्ती साध्या काँक्रीटपेक्षा ५ ते ६ पटीने जास्त असते.हे काँक्रीट अत्यंत दाट असल्याने हवामानाचा किंवा प्रदूषणाचा यावर परिणाम होत नाही, ज्यामुळे पुलाचे आयुष्य १०० वषपिक्षा जास्त वाढते. हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे पुलाचे स्ट्रक्चर हलके परंतु अत्यंत भक्कम होते, ज्यामुळे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये अधिक सुरक्षा मिळते.याला तडे जाण्याचे प्रमाण नगण्य असल्याने भविष्यातील दुरुस्तीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचतो.