कोरोनाकाळात होतेय कुष्ठरुग्णांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:41 PM2021-05-03T23:41:22+5:302021-05-03T23:41:46+5:30

नऊ महिने मानधनाविना : पाच दिवसांत देण्याचे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आश्वासन

Affordability of leprosy patients during Corona period | कोरोनाकाळात होतेय कुष्ठरुग्णांची परवड

कोरोनाकाळात होतेय कुष्ठरुग्णांची परवड

Next

कल्याण : केडीएमसी हद्दीतील कुष्ठरुग्णांना मनपा प्रशासनातर्फे दरमहिना अडीच हजार रुपये मानधन दिले जाते, परंतु मागील नऊ महिने त्यांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे कोरोनाच्या काळात त्यांची परवड होत आहे. या प्रश्नाबाबत मनपा प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही मानधनाला होणारा विलंब चर्चेचा विषय ठरला आहे.

पूर्वेतील हनुमाननगरमध्ये कुष्ठरुग्णांची १६० कुटुंबे आहेत. यातील काही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, तर सध्या येथे १०७ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांना दररोज मलमपट्टी करावी लागते. यातील ६७ रुग्णांना दरमहिना अडीच हजार रुपये मानधन दिले जाते. कुष्ठरुग्णांना मानधन देणारी केडीएमसी राज्यातील पहिली महापालिका आहे. आयुक्त रामनाथ सोनवणे आणि महापौर कल्याणी पाटील यांच्या कार्यकाळात हा मानधनाचा निर्णय अंमलात आणण्यात आला. कुष्ठरुग्णांना मानधन मिळावे, यासाठी कुष्ठमित्र गजानन माने आणि माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी केला होता. अठरा विश्वे दारिद्र्य, त्यात उपजीविकेचे कोणतेच मार्ग उपलब्ध नव्हते. त्यामुळे मनपाकडून मिळणारे मानधन कुष्ठरुग्णांसाठी मोठा आधार ठरले आहे. मात्र, मागील सप्टेंबर, २०२० ते आजपर्यंत ते मानधनापासून वंचित आहेत.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मानधनाअभावी कुष्ठरुग्णांची परवड होत आहे. माजी नगरसेवक शिंदे यांनी कुष्ठरुग्णांना लवकरात लवकर मानधन मिळावे, याकडे मनपाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि आरोग्य विभागाचे लक्ष वेधले 
आहे. 
हनुमाननगर कुष्ठसेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी सोमवारी आरोग्य विभागात जाऊन मानधनाबाबत चौकशी केली असता नऊपैकी सहा महिन्यांचे मानधन येत्या चार ते पाच दिवसांत तातडीने दिले जाईल, अशी माहिती त्यांना देण्यात आली.

कुष्ठरुग्ण लसीपासूनही वंचित
nहनुमाननगरमधील सुमारे १५० कुष्ठरुग्ण ४५च्या वरील वयोगटांतील आहेत. फेब्रुवारीपासून ४५ व त्यावरील वयोगटांसाठी कोविड लस देण्यास सुरुवात झाली, परंतु अद्याप हनुमाननगरमधील एकाही कुष्ठरुग्णाला लस दिली गेलेली नाही. बहुतांश रुग्ण हे बहुविकलांग आहेत. 
nत्यांच्यावर जखमा असल्याने त्यांना रांगेत उभे राहणे शक्य नाही. त्यामुळे हनुमाननगरमध्ये विशेष लसीकरणाची मोहीम राबवावी, अशी मागणी हनुमाननगर कुष्ठसेवा संस्थेने केडीएमसीकडे केली आहे. दरम्यान, आधीच लसीचा तुटवडा असल्याने कुष्ठरुग्णांसाठी लसीकरण मोहीम राबविणे आव्हान ठरणार आहे.

Web Title: Affordability of leprosy patients during Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.