(Image Credit : IndiaMART)

जेसीबी मशीन तुम्ही कुठेना कुठे कधीतरी पाहिली असेलच. आज या मशीनचा वापर जगभरात वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. सामान्यपणे जेसीबीचं काम खोदकाम करणे हे आहे. तसेच जड वस्तू उचलणे देखील आहे. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियात जेसीबीची जोरदार चर्चा रंगली होती. तुम्हाला हे माहीत असेलच की, जेसीबी हे पिवळ्या रंगाचे असतात. मात्र, जेसीबी पिवळ्या रंगाचे का असतात हे तुम्हाला माहीत आहे का? जेसीबी दुसऱ्या रंगाचे का नसतात? चला जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तरे...

जेसीबीच्या रंगाबाबत काही जाणून घेण्याआधी या मशीनच्या काही अनोख्या गोष्टीही जाणून घेऊ. जेसीबी ही ब्रिटनची मशीन तयार करणारी एक कंपनी आहे. या कंपनीचं मुख्यालय इंग्लंडच्या स्टॅफर्डशायर शहरात आहे. तर याचे प्लांट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत.

जेसीबी ही जगातली पहिली अशी मशीन आहे, जी नावाशिवायच १९४५ मध्ये लॉन्च केली होती. ही मशीन तयार करणारे अनेक दिवस या मशीनच्या नावाचा विचार करत होते. पण त्यांना वेगळं काही न सुचल्याने ही मशीन तयार करणारे जोसेफ सायरिल बमफोर्ड यांचच नाव मशीनला देण्यात आलं.

(Image Credit : Social Media)

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जेसीबी ही भारतात फॅक्टरी उभारणारी पहिली खाजगी कंपनी आहे. आज जगभरात जेसीबी मशीनची सर्वात जास्त निर्यात भारतात केली जाते. १९४५ मध्ये जोसेफ सायरिल बमफोर्ड यांनी सर्वात पहिली मशीन एक टीपिंग ट्रेलर तयार केली होती. त्यावेळी ही मशीन बाजारात ४५ पौंड म्हणजे आजच्या मूल्यानुसार ४ हजार रूपयांना विकली गेली होती.

(Image Credit : Social Media)

जगातला पहिला सर्वात वेगवान ट्रॅक्टर 'फास्ट्रॅक' जेसीबी कंपनीने १९९१ मध्ये तयार केला होता. या ट्रॅक्टरचा जास्तीत जास्त वेग हा ६५ किलोमीटर प्रति तास होता. 

(Image Credit : jcb.com)

आता जाणून घेऊ की, जेसीबी मशीन्स पिवळ्या रंगाच्या का असतात? जेसीबी मशीनला सुरूवातीच्या काळात पांढरा आणि लाल रंग दिला जात होता. नंतर मशीनला पिवळा रंग देण्यात आला. यामागे तर्क असा आहे की, पिवळ्या रंगामुळे जेसीबी खोदकाम केल्या जाणाऱ्या जागेवर सहजपणे दिसेल. दिवस असो वा रात्र जेसीबी स्पष्टपणे दिसेल. याने लोकांना हेही कळेल की, पुढे खोदकाम सुरू आहे.


Web Title: Why JCB machine has yellow colour, also know the interesting facts about JCB
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.