हवीहवीशी वाटणारी सुट्टी आता बोअर का होतेय? तुझं स्वतःचं आयुष्य डिझाइन करण्याचा हा काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 09:46 IST2026-05-02T09:46:15+5:302026-05-02T09:46:31+5:30
उन्हाळ्याची सुट्टी आत्ता सुरू झाली. पण मला कंटाळा यायला सुरुवात पण झाली.. मला सुट्टीत बोअर होऊ नये म्हणून मी काय करू? - कबीर, पुणे

हवीहवीशी वाटणारी सुट्टी आता बोअर का होतेय? तुझं स्वतःचं आयुष्य डिझाइन करण्याचा हा काळ
रुचिरा दर्डा
संस्थापक, पॅरेंट विथ पर्पज
ही एक गंमतच आहे. आपण खूप बिझी असतो तेव्हा वाटतं आपल्याला ब्रेक हवा आणि तो ब्रेक मिळतो तेव्हा आता या ब्रेकचं काय करावं हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे तुला जे वाटतंय ते कॉमन आहे; पण गमतीशीरही आहे.. चला, तुझी आणि तुझ्या मित्र-मैत्रिणींची उन्हाळ्याची सुट्टी इंटरेस्टिंग कशी करता येईल ते शोधूया.
कंटाळा येतो म्हणजे काहीतरी वाईट आहे हे आधी डोक्यातून काढून टाक. कंटाळा आला की त्यातूनच आपल्याला नवीन काहीतरी सुचतं.. त्यामुळे कंटाळा आला तरी वाईट वाटून घेऊ नकोस अजिबात. पण, कंटाळा आल्यावर काय करायचं हे मात्र कुणीच सांगत नाही, हो ना? मी सांगते. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तुझं स्वतःचं आयुष्य डिझाइन करण्याचा काळ आहे असं समज. काहीतरी गंमत होईल आणि कंटाळा जाईल अशी वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतःच काहीतरी केलं तर?
रोजचं रूटीन ठरव आणि ते फॉलो कर. म्हणजे खूप काटेकोर टाइमटेबल वगैरे नको. पण रोजच्या दिवशी काहीतरी छान करता येईल. सकाळी थोडा व्यायाम, सायकल चालवणं, खेळायला, चालायला जाणं. दुपारी घरीच थांबून चित्र काढणे किंवा काहीतरी आर्ट-क्राफ्ट कर. संध्याकाळी आईबाबांसोबत बाहेर जा किंवा मित्रांबरोबर ग्राउंडवर खेळ. एखादं नवीन कौशल्य शिकता येईल. त्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन क्लासही शोधता येईल. शाळा असते तेव्हा अभ्यासामुळे नवीन काही करून बघता येत नाही, मग ते आत्ता कर. एखादा नवीन खेळ, गाणं किंवा डान्स क्लास, चित्रकलेचा किंवा तुला आवडणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा क्लास करता येईल. घरातली छोटीमोठी कामं, स्वयंपाकही तू शिकू शकतोस. आई-बाबांना, आजी-आजोबांना मदत केलीस तर ते खुश होतील आणि तुलाही नवीन काहीतरी शिकायला मिळेल. स्क्रॅपबुक करणं, मित्र-मैत्रिणींसाठी कार्ड्स तयार करणं अशा गोष्टीही तुला आवडत असतील तर तू करू शकतोस, बघ विचार करून.
काहीच करायचं नाहीये असाही एखादा दिवस असू शकतो. एखाद्या दिवशी तुला काहीच करायचं नसेल, झोपायचं असेल किंवा नुसतंच लोळायचं असेल तरी चालेल. सुट्टीत असा निवांत दिवसही हवा ना कधीतरी..! आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सुट्टी आपोआप इंटरेस्टिंग होणार नाही, ते तुझं तुलाच करायला हवं. त्यामुळे ‘मला कंटाळा आला’ असं न म्हणता ‘आज मला काय करायचंय?’ असं स्वतःलाच विचार, तुला उत्तर नक्की सापडेल, आणि तुझी सुट्टी मस्त जाईल.