मनुष्यांचा सगळ्यात महागडा अवयव कोणता? ब्लॅक मार्केटमध्ये लावली जाते वाट्टेल ती बोली.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 16:03 IST2026-04-28T15:53:37+5:302026-04-28T16:03:10+5:30
Human Body Parts Price : काही अवयवांच्या किंमती बाजारात सगळ्यात जास्त झाल्या आहेत. अशात सगळ्यात महाग अवयव कोणता आणि इतकी किंमत का दिली जाते हे पाहुयात.

मनुष्यांचा सगळ्यात महागडा अवयव कोणता? ब्लॅक मार्केटमध्ये लावली जाते वाट्टेल ती बोली.....
Human Body Parts Price : मानवी शरीरातील सगळेच अवयव महत्वाचे असतात. प्रत्येकाचं काम वेगवेगळं असतं. एक जरी अवयव बिघडला तर याचा पूर्ण शरीरावर प्रभाव दिसायला लागतो. मानवी अवयवांच्या विक्रीवर कायदेशीरपणे बंदी आहे. पण तरी सुद्धा जगभरात मानवी अवयवांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. अवयवांची लाखो - कोट्यावधी रूपयांना तस्करी केली जाते. अमेरिकेच्या २०२५ मधील डेटानुसार, काही अवयवांच्या किंमती बाजारात सगळ्यात जास्त झाल्या आहेत. अशात सगळ्यात महाग अवयव कोणता आणि इतकी किंमत का दिली जाते हे पाहुयात.
कोणते अवयव सगळ्यात महाग?
मिलिमॅन रिपोर्टनुसार, अमेरिकेत सगळ्यात महागडं ट्रान्सप्लान्ट डबल लंग्सचं आहे. याची पूर्ण प्रक्रिया म्हणजे सर्जरी, हॉस्पिटलचं भाडं, औषधे आणि सर्जरीनंतरची काळजी याचा सरासरी खर्च साधारण २३ लाख ४६ हजार ५०० डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार जवळपास २.३४ कोटी रूपये इतका येतो. दुसऱ्या नंबरवर हार्ट ट्रान्सप्लान्ट आहे, ज्यासाठी १९,१८,७०० डॉलर म्हणजे १.९१ कोटी रूपये मोजावे लागतात. सिंगल लंग्ससाठी १८,१०,७०० डॉलर, इंटेस्टाइनसाठी १७,२९,५०० डॉलर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी १२,६१,८०० डॉलर मोजावे लागतात. तर लिव्हर ट्रान्सप्लांट १०,१७,८०० डॉलर म्हणजे साधारण १ कोटी रूपयात केलं जातं. ही किंमती फक्त कायदेशीर मेडिकल ट्रान्सप्लांटच्या आहेत.
लंग्स सगळ्यात महाग
डबल लंग ट्रान्सप्लांट सगळ्यात महाग आहे कारण ही सर्जरी फार किचकट असते. फुप्फुसं बदलणं, शरीरात फीट करणं आणि रिजेक्शनचा धोका कमी करणं हे सगळं फार किचकट असतं. हार्ट ट्रान्सप्लांटही काही सोपं नसतं. रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी हा खर्च गरजेचा असतो. पण सामान्य लोकांना हा परवडणारा नसतो. पण सगळ्यात जास्त धक्का तर ब्लॅक मार्केटच्या किंमती ऐकून बसतो. बंदी असूनही जगभरात ऑर्गन ट्रॅफिकिंगचा व्यवसाय ८४ कोटी ते १.७ अब्ज डॉलर इतका वर्षाला असतो. जास्तीत जास्त केसेसमध्ये किडनी सगळ्यात जास्त विकली जाते. ब्लॅक मार्केटमध्ये खरेदीदार ५० हजार ते १,२०,००० डॉलर इतकी किंमत चुकवतात. पण विक्रेत्याला केवळ ५ ते १० टक्केच मिळतात. बाकी ब्रोकर आणि माफिया खातात. लिव्हर, हार्ट आणि लंग्स स्मगलिंगच्या माध्यमातून विकले जातात. गरीब देशांमध्ये नोकरी किंवा पैशाचं आमिष देऊन अवयव काढले जातात. काही वेळा जबरदस्तीनेही अवयव काढले जातात.
वेगाने वाढतेय तस्करी
भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीनसारख्या देशांमध्ये हा धंदा खूप फोफावतोय. 'किडनी व्हॅली'सारखे भाग खूप प्रसिद्ध आहे, जिथे लोक आपली किडनी विकून गरजा पूर्ण करतात. ब्रोकर श्रीमंत रूग्णांना संपर्क करतात. ऑपरेशन नेहमी बेकायदेशीर क्लीनिकमध्ये केले जातात. सर्जरीनंतर जर डोनर आजारी पडला, तर ब्रोकर गायब होतो. पण इन्फेक्शन, रिजेक्शन आणि अटक होण्याचा धोका नेहमीच राहतो.
वैश्विक आकडेवारीनुसार, दरवर्षी साधारण १२ हजार बेकायदेशीर ट्रान्सप्लांट होतात, जे एकूण ट्रान्सप्लांटच्या १० टक्के आहे. पण खरी संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असू शकते. कारण बऱ्याच केसेस दाबल्या जातात. अनेक देशांनी कठोर कायदे केले आहेत. पण भ्रष्टाचार आणि गरीबीमुळे या केसेस थांबत नाही. अमेरिकेत कायदेशीर ट्रान्सप्लांटची वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे. हजारो रूग्ण अवयव मिळत नसल्याने जीव गमावतात. हीच कमतरता ब्लॅक मार्केट भरून काढतं. श्रीमंत लोक परदेशात जाऊन किंवा ब्रोकरच्या माध्यमातून अवयव खरेदी करतात.