महाराष्ट्रातील अनोखे गाव; 'मारुती सुझुकी'ची कार खरेदी करण्यावर बंदी, कारण जाणून चक्रावून जाल..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:24 IST2025-11-28T13:23:40+5:302025-11-28T13:24:30+5:30
गावात हनुमानाचे एकही मंदिर नाही; मुलांचे नावही मारुती-हनुमान ठेवले जात नाही.

महाराष्ट्रातील अनोखे गाव; 'मारुती सुझुकी'ची कार खरेदी करण्यावर बंदी, कारण जाणून चक्रावून जाल..!
दिग्गज कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी दरवर्षी भारतात हजारो-लाखो वाहनांची विक्री करते. यामुळेच भारतीय रस्त्यांवर प्रत्येक तिसरी कार मारुती सुझुकीची पाहायला मिळते. मात्र, महाराष्ट्रात एक असे गाव आहे, जिथे मारुती सुझुकीची कार चालवणे, विकत घेणे किंवा गावात कार फिरवण्यास मनाई आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. यामागे एक मोठी दंतकथा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील नांदूर निम्बा दैत्य गावात मारुती सुझुकी कंपनीची कार विकत घेणे, चालवणे किंवा गावात आणण्यास कडक मनाई आहे. विशेष म्हणजे, गावाच्या हद्दीत एकही हनुमान मंदिर नाही, गावातील लोक हनुमानाची पुजाही करत नाहीत. हनुमानाशी संबंधित कुठलीही गोष्ट गावात नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, गावातील कोणीही आपल्या मुलाचे नावदेखील “मारुती”, “हनुमान” किंवा तशाप्रकारची नावे ठेवत नाही.
या अनोख्या परंपरेमागची पौराणिक कथा
गावकऱ्यांच्या मते, शेकडो वर्षांपूर्वी निम्बा दैत्य, जो गावाचा रक्षक मानला जातो, त्याचे आणि हनुमानाचे (मारुती) भीषण युद्ध झाले होते. परिस्थिती इतकी गंभीर बनली की, शेवटी भगवान श्रीरामांना मध्यस्थी करावी लागली.
श्रीरामांनी निम्बा दैत्याला या परिसराची रक्षा करण्याचे वरदान दिले आणि हनुमानाने या गावापासून दूर राहावे, असा आदेश दिला. तेव्हापासून या गावात हनुमानाशी संबंधित कोणतीही प्रतिमा, पूजा, नाव किंवा वस्तू आणणे अशुभ मानले जाते. याच कारणामुळे ‘मारुती’ ब्रँडच्या गाड्यांनाही येथे प्रवेश नाही.
गावात हनुमान मंदिर नाही
विशेष म्हणजे, नांदूर निम्बा दैत्य गावात एकही हनुमान मंदिर नाही. गावकरी आपल्या मुलांचे नाव हनुमान, मारुती किंवा तत्सम ठेवत नाहीत. हनुमानाशी संबंधित कोणतीही प्रतिकात्मक गोष्ट गावात आणणे टाळले जाते. गावकऱ्यांचा दावा आहे की, असे केल्यास अशुभ गोष्टी होऊ लागतात.
मारुती कारवर बंदी; एका घटनेने वाढले अंधश्रद्धेचे सावट
गावात एक कथा विशेषतः सांगितली जाते. काही वर्षांपूर्वी गावातील एका डॉक्टरांनी मारुती 800 विकत घेतली. कार घेतल्यानंतर अचानक त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली. आर्थिक व वैयक्तिक अडचणी वाढल्या. शेवटी डॉक्टरांनी ती कार विकली आणि टाटा सुमो घेतली. गावकऱ्यांच्या मते, यानंतर त्यांचे काम पुन्हा वाढू लागले. या घटनेने गावात मारुती कार अशुभ मानण्याची धारणा आणखी घट्ट झाली.
इतर स्थानिक कथा
गावात काही इतर छोट्या-मोठ्या गोष्टीही सांगितल्या जातात. “मारुती” नाव असलेल्या मजुरांना अचानक आजारपण येणे, मारुती कारचा हॉर्न ऐकणेही अपशकुन मानले जाणे, गावात प्रवेश करण्यापूर्वी “मारुती” लिहिलेल्या वाहनांचे नाव झाकणे...अशा गोष्टी पाळल्या जातात. मात्र, ही संपूर्ण मान्यता फक्त हनुमानाशी संबंधित नावांपुरतीच मर्यादित आहे. बाकी सर्व देवतांची पूजा येथे सर्वसामान्य पद्धतीने केली जाते.