नवरा-बायकोच्या भांडणांच्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. ज्यातील काही खूप हैराण करणाऱ्या असतात. वैवाहिक जीवनात पती-पत्नीचं भांडण हे होतच राहतं. हे नातं विश्वासावर टिकून असतं. विश्वास उडाला की, संसाराचा गाडा बिघडतो. संशय ही एक अशी बाब आहे ज्यामुळे हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त होतं. एका व्यक्तीला पत्नीवर संशय करणं चांगलंच महागात पडलं. त्याला लाटण्यानं मार खावा लागला. कानपूरच्या बिठूर भागातील या व्यक्तीला पत्नीवर संशय होता. त्यामुळे त्यानं तिच्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग अॅप डाउनलोड केलं. जेव्हा पत्नीला हे समजलं तेव्हा तिनं त्याची लाटण्यानं धुलाई करून टाकली. नंतर हे प्रकरण पोलिसातही गेलं.
मीडिया रिपोर्टनुसार, कानपूरच्या बिठूर भागात फॅक्टरीमध्ये काम करणारी ही व्यक्ती पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहते. या व्यक्तीला संशय होता की, तो जेव्हा कामावर जातो तेव्हा त्याची पत्नी कुणासोबत तरी बोलते. कदाचित तिचं अफेअर आहे.
खरं खोटं जाणून घेण्यासाठी त्यानं कॉल रेकॉर्डिंग अॅपची माहिती घेतली. नंतर गपचूप जाऊन पत्नीच्या फोनमध्ये हे अॅप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं. त्याला वाटलं पत्नी कुणासोबत बोलते हे त्याला या अॅपद्वारे कळेल.
तो नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेला. रात्री परत आला आणि पत्नीचा मोबाइल घेऊन टेरेसवर गेला. दिवसभर ती कुणासोबत बोलली याचं रेकॉर्डिंग ऐकू लागला. दुसरीकडे पत्नी घरात मोबाइल दिसत नसल्यानं शोधत शोधत टेरेसवर आली. पत्नीला दिसलं की, पती फोनमध्ये रेकॉर्डिंग ऐकत आहे.
हे बघून दोघांमध्ये वाद सुरू झाला. पत्नी इतकी संतापली की, तिनं पतीची लाटण्यानं धुलाई करून टाकली. इतकंच नाही तर त्याला घराबाहेरही काढलं. पत्नीच्या मारहाणीनंतर पती थेट पोलिसांकडे गेला. पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी दोघांना समजावून सांगण्याचा विचार केला.
पोलिसांनी व्यक्तीच्या पत्नीला पोलीस स्टेशनला बोलवलं. दोघांना समोर बसवून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या गेल्या. पत्नीचा आरोप आहे की, पती तिच्यावर संशय घेतो. साधारण १ तास समजावल्यावर व्यक्तीला सांगण्यात आलं की, पत्नीवर संशय घेऊ नको. तिच्या फोनला हात लावू नको. तिच्यावर विश्वास ठेव. दरम्यान पतीनं त्याची चूक मान्य केली आणि दोघांनाही घरी पाठवण्यात आलं. पोलिसांनी त्यांच्यासमोरच फोनमध्ये डाउनलोड केलेलं अॅप डिलीट केलं.