सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफाचा मालक कोण, कोण वसूल करतं येथील भाडे आणि किती मिळतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:38 IST2026-05-08T16:21:21+5:302026-05-08T16:38:35+5:30
Burj Khalifa Facts : अनेकांना वाटतं की बुर्ज खलिफा ही दुबई सरकार किंवा संयुक्त अरब अमीरातीच्या मालकीची आहे किंवा काही लोकांना तर असंही वाटतं की, ही इमारत दुबईतील एखाद्या श्रीमंत शेखाची असेल. पण असं नाहीये.

सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफाचा मालक कोण, कोण वसूल करतं येथील भाडे आणि किती मिळतं?
Burj Khalifa Facts : जेव्हा जगातील सर्वात उंच इमारतीचा उल्लेख होतो, तेव्हा सर्वप्रथम बुर्ज खलिफा इमारतीचं नाव घेतलं जातं. दुबईच्या चमकदार स्कायलाइनमध्ये उभी असलेली ही इमारत केवळ एक बिल्डिंग नसून आधुनिक अभियांत्रिकी आणि आलिशान जीवनशैलीचे प्रतीक मानली जाते. पण या भव्य इमारतीचा मालक नेमका कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो.
अनेकांना वाटतं की बुर्ज खलिफा ही दुबई सरकार किंवा संयुक्त अरब अमीरातीच्या मालकीची आहे किंवा काही लोकांना तर असंही वाटतं की, ही इमारत दुबईतील एखाद्या श्रीमंत शेखाची असेल. मात्र, प्रत्यक्षात ही इमारत Emaar Properties या प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनीने विकसित केली आहे. या कंपनीचे संस्थापक मोहम्मद अली अलाब्बार आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या बुर्ज खलिफाची मालकी Emaar Properties कडेच आहे. मोहम्मद अली अलाब्बार यांनी ही इमारत केवळ व्यावसायिक प्रकल्प म्हणून नव्हे, तर जगासमोर दुबईची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने उभारली होती.
६ वर्षांत पूर्ण झाले बांधकाम
बुर्ज खलिफाचे बांधकाम २००४ मध्ये सुरू झाले आणि सुमारे सहा वर्षांच्या मेहनतीनंतर २०१० मध्ये ती अधिकृतपणे जगासमोर सादर करण्यात आली. या इमारतीची उंची तब्बल ८२८ मीटर म्हणजेच जवळपास २७१७ फूट आहे. यात एकूण १६३ मजले आहेत, ज्यामुळे ती आजही जगातील सर्वात उंच इमारत मानली जाते. या इमारतीतील हाय-स्पीड लिफ्ट काही सेकंदांतच लोकांना वरच्या मजल्यांवर पोहोचवतात. स्वच्छ हवामानात या इमारतीचा वरचा भाग सुमारे ९५ किलोमीटर अंतरावरूनही दिसतो, असे सांगितले जाते.
लक्झरीसाठीही प्रसिद्ध
बुर्ज खलिफा फक्त उंचीसाठीच नाही, तर आलिशान सुविधांसाठीही जगभर प्रसिद्ध आहे. येथे ३०० हून अधिक लक्झरी हॉटेल रूम्स आणि सुमारे ९०० हाय-एंड अपार्टमेंट्स आहेत. याशिवाय दुबई मॉल आणि दुबई फाउंटन यांसारखी प्रसिद्ध आकर्षणेही याच परिसरात आहेत. विशेष म्हणजे, या इमारतीची बाहेरील स्वच्छता पूर्ण करण्यासाठी जवळपास तीन महिने लागतात.
भाड्याचा फायदा कोणाला?
बुर्ज खलिफामध्ये प्रॉपर्टी खरेदी करणे अत्यंत महाग मानले जाते. २०२४ पर्यंत येथे प्रति स्क्वेअर फूट किंमत सुमारे ३,००० दिरहमपर्यंत पोहोचली होती. भारतीय चलनात हे अंदाजे ७० हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट इतके होते. येथील एका बेडरूमच्या अपार्टमेंटचे वार्षिक भाडे १.५ ते १.८ लाख दिरहमपर्यंत असल्याचे सांगितले जाते. या सर्व भाडे आणि कमाईचा मुख्य फायदा Emaar Properties आणि त्यांचे संस्थापक मोहम्मद अली अलाब्बार यांनाच मिळतो.