जळगाव रेल्वे दुर्घटना: १२ मृतांमध्ये ३ महिला, पाच जणांची ओळख पटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 21:34 IST2025-01-22T21:03:54+5:302025-01-22T21:34:01+5:30

रेल्वे अपघातातील मयत १२ प्रवाशांमध्ये ८ पुरुष,एक दहा वर्षीय बालक आणि तीन महिलांचा समावेश आहे.सर्वच मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...

Jalgaon pushpak -benglurur train accident: 3 women, 5 men among 12 dead identified | जळगाव रेल्वे दुर्घटना: १२ मृतांमध्ये ३ महिला, पाच जणांची ओळख पटली

जळगाव रेल्वे दुर्घटना: १२ मृतांमध्ये ३ महिला, पाच जणांची ओळख पटली

रेल्वे अपघातातील मयत १२ प्रवाशांमध्ये ८ पुरुष,एक दहा वर्षीय बालक आणि तीन महिलांचा समावेश आहे.सर्वच मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले गेले आहेत. आतापर्यंत पाच मयतांची ओळख पटली आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२५७-२२१७१९३ या क्रमांकावर हेल्पलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. घटनास्थळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (जीएमसी) अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर दाखल झाले आहेत. जळगाव, पाचोरा, जामनेरहून ६० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच जीएमसीतील डीएनए चाचणी एक पथक घटनास्थळी दुसरे पथक शासकीय रुग्णालयात सक्रीय झाले आहे.

चार ठिकाणी नियंत्रण कक्ष
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, पाचोरा, भडगाव आणि भुसावळ तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष तातडीने कार्यान्वीत करण्यात आले आहेत. जखमींसह मयतांच्या नातेवाईक, वैद्यकीय यंत्रणा आणि जखमींसाठी बेड उपलब्ध करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे आहेत. तर जीएमसीत दाखल होणाऱ्या जखमींवर उपचारासाठी मदतकार्याची सुत्रे अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

‘आयएमए’ला मागितली मदत
निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन सर्वच डॉक्टरांना उपचार कार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. सचिव डॉ.अनिता भोळे यांनी तयारी दाखविल्यानंतर आयएमएच्या पथकाने जीएमसी आणि जिल्हा रुग्णालयात मदतकार्य सुरु केले.

घटना अतिशय दुर्देवी आणि वेदनादायी आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले आहेत.जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलो आहे. सद्यस्थितीत कार्यकर्त्यांच्या मदतीने मदतकार्य हाती घेतले आहे. मयत व जखमींच्या आकड्याविषयी अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनच जाहीर करणार आहे.
-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिव व केंद्रीय यंत्रणांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. पाचोरासह जळगावातील रुग्णालयात जखमींसाठी पुरेसे बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून मदतकार्य सुरु आहे.
-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.
 

Web Title: Jalgaon pushpak -benglurur train accident: 3 women, 5 men among 12 dead identified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.