एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 08:41 IST2026-04-30T08:40:59+5:302026-04-30T08:41:32+5:30
दोन अपघातांत नववधू उपवर मुलीसह पाच जण ठार

एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
जळगाव - जिल्ह्यात बुधवार अपघातवार ठरून दोन अपघातांत पाच जण ठार, तर आठ जण जखमी झाले. यात तीन दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर माहेरी परतणारी नववधू व ८ मे रोजी लग्न असल्याने वणी गडावर लग्नाची पत्रिका ठेवून गावी परतत असलेल्या वाग्दत्त वधू मुलीसह पाच जण ठार झाले. वराड (ता.धरणगाव) व महादेव बांबरूड (ता.पाचोरा) येथे हे अपघात झाले.
पहिल्या ओवाळणीला माहेरी येताना काळाचा घाला
बुधवारी (दि. २९ एप्रिल) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वराडजवळ (ता.धरणगाव) चाक निखळून वाहन समोरील टँकरवर धडकले. त्यात तीन दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर पहिल्या ओवाळणीला माहेरी परतणारी नववधू पूजा रवी वाघळकर (वय २२), तिचे काका जगदीश चंद्रभान वाघळकर (५२) व मामा दत्तू तुळशीराम भागवत (५२, सर्व रा.महाकालीनगर, अकोला) हे ठार झाले, तसेच नववधूचे वडील रवी प्रभाकर वाघळकर, चुलतभाऊ प्रेम भारत वाघळकर (२४), मेहुणे नितेश कडोळे (३५), अमोल गीते (३५), आजोबा तुळशीराम भागवत (६७), भाचा अंश नितेश कडोळे (१४) हे जखमी झाले.
गडावर लग्नपत्रिका ठेवून परतताना टायर फुटला
दुसरा अपघात पाचोरा तालुक्यातील महादेव बांबरुडजवळ झाला. कारचे टायर फुटून ती झाडावर धडकली. त्यात वणी गडावर लग्नपत्रिका ठेवून गावी परतणारी वाग्दत्त वधू शिखा विनायक बेलसरे (२७) आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या मीना सुनील मानकर (४५, दोन्ही रा.काशीकर कॉलनी, परतवाडा, जि.अमरावती) या दोन्ही ठार झाल्या, तसेच शिखाचा भाऊ शुभम बेलसरे, मीना मानकर यांचे पती सुनील जखमी झाले आहेत. शिखा हिचे ८ मे रोजी लग्न होते.