जळगाव विमानतळावर रात्रीही विमान उतरविणे शक्य, प्रवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 05:57 AM2019-11-24T05:57:40+5:302019-11-24T05:57:59+5:30

जळगाव विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरविण्यासाठी आवश्यक असलेली इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रुट (आयएफआर) ही सुविधा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

 It is possible to land at Jalgaon airport at night | जळगाव विमानतळावर रात्रीही विमान उतरविणे शक्य, प्रवाशांना दिलासा

जळगाव विमानतळावर रात्रीही विमान उतरविणे शक्य, प्रवाशांना दिलासा

Next

- खलील गिरकर
मुंबई : जळगावविमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरविण्यासाठी आवश्यक असलेली इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रुट (आयएफआर) ही सुविधा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) सुधारित अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, २० डिसेंबरपूर्वी ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एएआय)च्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
जळगावविमानतळावरील व्हीएफआर प्रणाली बदलून आयएफआर करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये डीजीसीएकडे अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावेळी धावपट्टीवरील वैमानिकाला मार्गदर्शन करणाºया सिग्नल दिव्यांमध्ये सेकंडरी सर्किट बसविणे, विमान उतरविण्याच्या अ‍ॅप्रोच मार्गामधील उच्च क्षमतेची वीजवाहिनी बाजूला करणे, या मार्गामध्ये असलेली काही झाडे तोडणे यासह काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश डीजीसीएने दिले होते, तसेच अन्य काही आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यानंतर, सर्व आक्षेपांचे निराकरण करून, तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करून २० नोव्हेंबर रोजी नव्याने अर्ज दाखल करण्यात आला. आता सर्व बाबींची पूर्तता करण्यात आल्याने डीजीसीए आयएफआर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हिरवा कंदील दाखवेल आणि २० डिसेंबरपूर्वी ही सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कधी मिळते
परवानगी?
व्हिज्युअल्स फ्लाइट रुटमध्ये विमान चालविताना वैमानिकाला किमान ५ हजार मीटर दृश्यमानता असणे गरजेचे आहे, तर इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रुटमध्ये (आयएफआर) ही दृश्यमानता ३ हजार मीटर असली तरी चालते.
सूर्यास्तानंतर दृश्यमानता कमी होत असल्याने व्हीएफआर प्रणाली लागू असलेल्या विमानतळांमध्ये विमान उतरविण्यास हवाई नियंत्रण कक्षाकडून परवानगी दिली जात नाही. मात्र, आयएफआर प्रणाली लागू असेल, तर ही परवानगी दिली जाते.

खराब हवामानाचा फटका
सध्या जळगाव विमानतळावर व्हिज्युअल्स फ्लाइट रुटद्वारे (व्हीएफआर) विमान उतरविले जाते. त्यामुळे केवळ सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत विमान उतरविणे शक्य होते. काही वेळा खराब हवामान, अन्य विमानतळावरील वाढत्या वाहतुकीमुळे, जळगावात येणाºया विमानांना विलंब होतो. त्याचा फटका प्रवाशांना बसतो. विमान उतरवता येत नसल्याने विमानाला इतर विमानतळावर वळविले जाते. मात्र, आयएफआर ही सुविधा उपलब्ध झाल्यावर रात्रीच्या वेळी जळगाव विमानतळावर विमान उतरविणे शक्य होईल. त्यामुळे विमान वाहतूक वाढण्याचीही शक्यता आहे.

Web Title:  It is possible to land at Jalgaon airport at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.