झोपेतच चाकूने पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात हजर होत दिली खूनाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:11 IST2025-08-21T15:10:51+5:302025-08-21T15:11:31+5:30
जळगावात झोपेतच पत्नीची चाकूने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

झोपेतच चाकूने पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात हजर होत दिली खूनाची कबुली
Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी खूनाची घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयासह माहेरून दहा लाख रुपये आणावे यासाठी पतीने पत्नीची झोपेतच हत्या केली. नितीन दौलत शिंदे (वय ३५) याने पत्नी अर्चना ऊर्फ कविता नितीन शिंदे (वय ३२) हिचा खून केला. त्यानंतर तो स्वतः पोलीस पोहोचला आणि गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयताचा भाऊ आकाश सपकाळ याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन आणि अर्चना यांच्यात वाद सुरू होता. त्यात नितीन हा अर्चना हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच माहेरून दहा लाख रुपये आणावे, यासाठी तगादा लावला होता. त्या वादातूनच मध्यरात्री अर्चना झोपेत असताना नितीनने तिच्यावर हल्ला चढवत शस्त्राने वार केले. अर्चना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती त्याने तिच्या आईला दिली. त्यानंतर अर्चनाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत असतानाच रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आपण खून केल्याचे सांगत नितीन हा लोहारा पोलिसांच्या स्वाधीन झाला. याप्रकरणी मयत अर्चना हिची सासू बेबाबाई हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी अटकेत असलेल्या नितीन आणि बेबाबाई शिंदे यांना पाचोरा न्यायालयात हजर केले. दोघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मयत अर्चना ही शिवना येथील आपल्या नातेवाइकांना भेटून सायंकाळीच लोहारा येथे आल्याचे बोलले जात आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. या घटनेनंतर या चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले आहे.
अर्चना मंगळवारी रात्री हरिपाठ करण्यासाठी बसस्थानक परिसरात गेली होती. दिवसभर शेतात काम करुन रात्री हरिपाठ केल्यानंतर अर्चना घरात झोपली होती. त्यानंतर नितीन उशिराने घरी आला आणि त्याने भाजीपाला कापण्यासाठीच्या चाकूने झोपेत असलेल्या अर्चनावर सपासप वार केले.