बायकोचा 'विवाह' रोखणाऱ्या पतीला प्रियकराकडून मारहाण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:38 IST2025-05-08T17:36:10+5:302025-05-08T17:38:27+5:30
विवाह रोखण्यासाठी आलेल्या पतीला महिलेच्या प्रियकराने मारहाण केली

बायकोचा 'विवाह' रोखणाऱ्या पतीला प्रियकराकडून मारहाण!
रावेर : कौटुंबीक वादातून जळगाव येथे दोन वर्षांपासून पती, मुलगा तथा मुलीपासून विभक्त राहत असलेली ३४ वर्षीय विवाहिता गारखेडा (ता. जामनेर) येथे प्रियकरासोबत पुनर्विवाह करीत होती. याची माहिती मिळाल्यावर विवाह रोखण्यासाठी बहादरपूर (ता. पारोळा) येथून आलेल्या आधीच्या पतीला महिलेच्या प्रियकराने मारहाण केली. तालुक्यातील भोकरी शिवारातील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर मंदिरात ही घटना सोमवारी घडली.
जळगाव शहरातील माहेरवाशीण असलेल्या विवाहितेचा बहादरपूर (ता. पारोळा) येथील युवकाशी विवाह झाला होता. यानंतर त्यांच्या संसारवेलीवर मुलगा व मुलगी असे दोन अपत्यांचे पुष्प फुलले. १६ वर्षे संसार सुरु होता. दरम्यान, संसाराचा रहाटगाडा हाकताना पती व पत्नीत वादविवाद निर्माण झाला. त्यामुळे विवाहिता पतीसह १४ वर्षाचा मुलगा व १२ वर्षाची मुलगी असा संसार सोडून जळगाव येथे दोन वर्षापासून विभक्त राहत होती. या विवाहितेचे सूत गारखेडा येथील एकाशी जुडले. दोघांनी रावेर तालुक्यातील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर मंदिरात सोमवारी शुभमंगल करण्याचा बेत आखला. ही खबर पतीला लागली. फारकत दिली नसताना पत्नी दुसरा विवाह करीत असल्याने पतीने आई-वडिलांसोबत श्रीक्षेत्र ओंकारेश्वर मंदिर गाठले. तिच्या पुनर्विवाहाला विरोध केला. त्यावेळी महिलेच्या प्रियकराने पतीला व सासू-सासऱ्यांना मारहाण केली. एवढेच नाही तर त्या विवाहितेने शिवीगाळ करून त्यांना पिटाळून लावले.