Congress-NCP seats still difficult in jalgaon district | अस्तित्व टिकवणे अवघड तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीत जागांवरून वाद!

अस्तित्व टिकवणे अवघड तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीत जागांवरून वाद!

- सुशील देवकर

जळगाव: जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. राष्ट्रवादीचा एकच आमदार निवडून आलेला असताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना जिल्ह्यात अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. इतकी बिकट परिस्थिती असतानाही या दोन्ही पक्षांमध्ये अद्यापही जिल्ह्यातील जागांवरून वाद सुरू असल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी रावेरची जागा काँग्रेसला देताना झालेल्या तडजोडीत जामनेर व अमळनेर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीला देण्याचे ठरल्याची चर्चा असताना काँग्रेस व राष्ट्रवादीचेही जिल्ह्यातील पदाधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. एकीकडे सेना-भाजपा जागा वाटपावरून वाद सुरू असताना काँग्रेस-राष्ट्रवादीतही मतदार संघावरूनच गोंधळ कायम असल्याचे चित्र आहे.

२००४ व २००९ मधील विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून लढल्या. त्यावेळी ठरलेल्या जागा वाटपाच्या सुत्रानुसार जळगाव जिल्ह्यात काँग्रेसकडे जळगाव शहर, जामनेर, रावेर व अमळनेर असे चार मतदारसंघ तर राष्ट्रवादीकडे उर्वरीत ७ मतदार संघ असे सूत्र ठरले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत सेना-भाजपा स्वतंत्र लढले. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीही स्वतंत्र लढले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकत्र लढले. त्यावेळी जिल्ह्यातील रावेर व जळगाव हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच वाट्याला असतानाही रावेर मतदारसंघ शेवटच्या क्षणी काँग्रेसला देण्यात आला होता. त्यावेळी वरिष्ठ पातळीवर झालेल्या तडजोडीत काँग्रेसकडील जामनेर व अमळनेर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने मागून घेतल्याची चर्चा होती. मात्र याबाबत जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांशी कोणतीच चर्चा झालेली नाही.

आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्यावर काँग्रेसला केवळ रावेर व जळगाव मतदारसंघच वाट्याला येणार असल्याची चर्चा सुरू होताच काँग्रेसचे पदाधिकारी खडबडून जागे झाले. याबाबत वरिष्ठांशी संपर्कही साधण्यात येऊन पूर्वीच्या चार जागांसोबतच आणखी काही जागा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याभेटीची वेळही मागण्यात आली आहे. १३ अथवा १४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी थोरात यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

काँग्रेसचा ‘मुक्ताईनगर’वर दावा
पूर्वीच्या जागा वाटपानुसार काँग्रेसकडे चार जागा तर कायम ठेवाव्याच शिवाय जेथे राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे, अशा जागाही काँग्रेसकडे घ्याव्यात, अशी मागणी जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यात मुक्ताईनगरच्या जागेवर काँग्रेसकडून दावा केला जात आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीत रावेर मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचे उदाहरण दिले जात आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर याबाबत काय दखल घेतली जाते? याबाबत उत्सुकता आहे.

Web Title: Congress-NCP seats still difficult in jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.