एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:59 IST2025-11-03T13:58:51+5:302025-11-03T13:59:42+5:30
एकनाथ खडसे यांच्या जळगावातील मुक्ताई बंगल्यात झालेल्या चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील मुक्ताई बंगल्यात झालेल्या चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य 3 आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह एकूण 6 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र, आरोपींकडून कोणतेही कागदपत्रे, सीडी, पेनड्राईव्ह मिळालेले नाहीत, असं पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात झालेल्या चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. जळगाव येथे घरफोडी केल्यानंतर आरोपींनी उल्हासनगर येथे चिराग सय्यद या व्यक्तीकडे मुद्देमाल सोपवला होता. तसेच चिराग सय्यद याने हा मुद्देमाल कैलास खंडेलवाल नामक सराफ व्यवसायाकडे दिला होता. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष घरफोडी करणारे तीन आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. एजाज अहमद, मोहम्मद बिलाल, बाबा अशी या मुख्य आरोपींची नावे आहेत. हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
खडसेंचे आरोप राजकीय हेतूने?
एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्यानंतर त्यांनी आपल्या घरातून कागदपत्रे, सीडी व पेनड्राईव्ह चोरी झाली असल्याचा दावा केला होता. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे, सीडी व पेनड्राईव्ह आढळलेला नाही. तसेच एकनाथ खडसे यांनी एफआयआरमध्ये तसेच पुरवणी जबाबात कागदपत्रे, सीडी व पेनड्राईव्ह चोरी झाल्याचे म्हटले नसल्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळं या प्रकरणात खडसेंचे आरोप राजकीय हेतूने होते का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.