लाचखोर आयुक्ताच्या घरात 'खजिना'! ५ लाख रोकड, १६ तोळे सोने, पावणेतीन किलो चांदी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:37 IST2025-10-18T13:36:23+5:302025-10-18T13:37:07+5:30
जालना मनपा आयुक्त लाचखोर खांडेकरास एक दिवसाची पोलिस कोठडी; दुसऱ्या दिवशीही वाजविले फटाके

लाचखोर आयुक्ताच्या घरात 'खजिना'! ५ लाख रोकड, १६ तोळे सोने, पावणेतीन किलो चांदी जप्त
जालना : १० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या जालना महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानाची एसीबीच्या पथकाने गुरुवारी रात्री झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत पाच लाख २० हजारांची रोकड, १६ तोळे सोने आणि पावणेतीन किलो चांदी आढळून आली. खांडेकरांना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
वाल्मीकनगर पूल ते रिंगरोडपर्यंत सीसीरोड व डीपी रोड काम, भक्कड फार्म ते भवानी रस्त्याचे सीसी रोड व भूमिगत गटार बांधकाम, जालना मनपाच्या तिसऱ्या मजल्याचे बांधकाम व एपीएमसी रिंग रोड ते हिंदनगरपर्यंत २४ मीटर रुंद डीपी रोड कामाची वर्कऑर्डर देणे व देयके मंजूर करण्यासाठी आयुक्त संतोष खांडेकर यांनी ४० लाख घेतले होते. वाल्मीकनगर पूल ते रिंग रोडपर्यंत सीसी रोड व डीपी रोडचे काम पूर्ण करून २ कोटी ८२ लाखांचे देयक मंजुरीसाठी सादर केल्यानंतर एक कोटी ९२ लाख देण्यात आले होते. उर्वरित ९० लाख व इतरकामांचे एक कोटी ६० लाख काढण्यासाठी २० लाखांची मागणी करीत ते शासकीय निवासस्थानी देण्यास खांडेकरांनी सांगितल्याची तक्रार तक्रारदाराने एसीबीकडे दिली होती. तक्रारीची शहानिशा करून गुरुवारी रात्री ७:३० वाजण्याच्या खांडेकरांनी १० लाख रुपये स्वीकारताच कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईनंतर पथकाने खांडेकरांच्या शासकीय निवासस्थानाची आणि मूळ गाव असलेल्या हणमंतगाव (ता. सांगोला) येथील घराचीही झाडाझडती घेतली. यात शासकीय निवासस्थानात पाच लाख २० हजारांची रोकड, १६ तोळे सोने आणि पावणेतीन लाख रुपयांची चांदी आढळून आली आहे.
दुसऱ्या दिवशीही वाजविले फटाके
मनपा आयुक्त संतोष खांडेकर हे लाच प्रकरणात अडकल्याचे समजताच काही गुत्तेदारांनी गुरुवारी रात्रीच एसीबीच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडत कारवाईचे स्वागत केले होते, तर दुसऱ्या दिवशी खांडेकर यांना सदरबाजार ठाण्यातून एसीबीच्या कार्यालयात आणल्यानंतरही काहींनी फटाके फोडून संविधानाचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. तर काही कार्यकर्त्यांनी जैसी करनी वैसी भरनी म्हणत महानगरपालिकेसमोरच घोषणाबाजी केली.