चिमुकलीचा वाढदिवस सुरू असतानाच वडिलांचे छत्र हरपले, मुलांच्या नशिबी आईसारखाच संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:08 IST2025-06-18T16:08:08+5:302025-06-18T16:08:43+5:30
खेळण्याच्या वयात आई-वडिलांना आणि आता क्रिकेट खेळताना पतीला गमवावे लागल्याने महिलेवर दुःखाचा डोंगर

चिमुकलीचा वाढदिवस सुरू असतानाच वडिलांचे छत्र हरपले, मुलांच्या नशिबी आईसारखाच संघर्ष
- फकिरा देशमुख/रऊफ शेख
भोकरदन : काही जणांच्या पाचवीलाच संघर्ष, दु:ख पुजलेले असते. अशा व्यक्तींना एकापाठोपाठ एक संकटांना सामोरे जावे लागते, जीवनाशी झगडावे लागते. असेच दु:ख लहानेवाडी (ता. फुलंब्री) येथील एका माऊलीच्या वाट्याला आले. एक वर्षाच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्याची तयारी चालू असतानाच पतीचा मृत्यू झाला. खेळण्याच्या वयात आई-वडिलांना आणि आता क्रिकेट खेळताना पतीला गमवावे लागले.
घरी मुलीचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी असतानाच सोमनाथ चंद्रभान बहादुरे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना १६ जून रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी एक वाजता लहानेवाडी (ता. फुलंब्री) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमनाथ यांच्या अकाली निधनाने त्यांचा मुलगा आर्यन (वय ५) व मुलगी काव्या यांच्या डोक्यावरची पितृत्वाची छाया हरपली आहे. पत्नी कावेरी बहादुरे यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भोकरदन शहरात पंचायत राज चषक क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या. सोमवारी रात्री आठच्या सुमारास क्रिकेट सामन्यावेळी सोमनाथ बहादुरे हे गोलंदाजी करताना मैदानावरच कोसळले होते. त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सोमनाथ यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.
मुलांच्या नशिबी तेच आले
सोमनाथ बहादुरे यांची पत्नी कावेरी यांच्या नशिबी संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कावेरी या १० वर्षांच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्या १३ वर्षांच्या असताना वडिलांचे छत्र हरपले, तसेच त्यांचे दोन भाऊदेखील पोरके झाले आहेत. त्यांचा सांभाळ आईच्या आईने केला.
सुखाचे दिवस येत असताना घात
कावेरी यांचे लग्न सोमनाथ बहादुरे यांच्यासोबत झाले. सोमनाथ यांच्या घरची परिस्थिती हलाखीचीच होती. आई-वडील व भाऊ मिळून दीड एकर कोरडवाहू शेतजमीन असल्याने कसे भागणार, म्हणून सोमनाथ बहादुरे यांनी शिक्षण झाल्यानंतर खासगी कंपनीत नोकरी मिळवली. यानंतर त्यांना एका फायनान्स कंपनीत समाधानकारक पगाराची नोकरी मिळाली. भोकरदन शहरात भाड्याची खोली घेऊन पत्नी कावेरी, मुलगा आर्यन व मुलगी काव्या यांच्यासह वास्तव्यास होते. नेमके त्यांना सुखाचे दिवस येत असल्याचे दिसतानाच सोमनाथ यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. यामुळे आता पुढे जगावे कसे, असा प्रश्न कावेरी बहादुरे यांच्यासमोर उभा राहिला आहे. सोमनाथ यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.
रुग्णवाहिका आल्यानंतर आक्रोश
सोमवारी सोमनाथ बहादुरे यांचा मृत्यू झाल्याचे पत्नी कावेरी बहादुरे यांना कळविण्यात आले नाही. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असल्याचे नातलग व मित्रपरिवाराने कावेरी बहादुरे यांना सांगितले होते. मंगळवारी सकाळी नऊच्या दरम्यान ‘सोमनाथला भेटण्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगरला जाऊ,’ म्हणून घरमालक व नातेवाईक कावेरी, मुलगा आर्यन व मुलगी काव्या यांना सोबत घेऊन निघाले. मात्र, फुलंब्रीजवळ वाहन लहानेवाडीकडे वळले, तेव्हा कावेरीबाई यांच्या मनात पाल चुकचुकली. त्यांनी ‘माझ्या पतीला काय झाले आहे, हे सांगा,’ असे म्हणत हंबरडा फोडला. त्यानंतर दारात सोमनाथ यांचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका आल्यानंतर एकच आक्रोश झाला.