अंबडच्या एसबीआय बँकेत धक्कादायक चोरी; काउंटरवरून २ लाख ३० हजारांची रक्कम लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 14:51 IST2025-07-10T14:47:13+5:302025-07-10T14:51:06+5:30
चोरीची ही घटना थेट बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, बँकेतील सुरक्षा व्यवस्थेच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

अंबडच्या एसबीआय बँकेत धक्कादायक चोरी; काउंटरवरून २ लाख ३० हजारांची रक्कम लंपास
अंबड (जालना): शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून तालुक्यातील शेवगा येथील रहिवासी रामेश्वर गणेश बारहाते यांचे २ लाख ३० हजार रुपये भरदिवसा काउंटरवरून चोरी गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ९) दुपारी १.३५ वाजता घडली. चोरीची ही घटना थेट बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, बँकेतील सुरक्षा व्यवस्थेच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, रामेश्वर बारहाते हे बुधवारी दुपारी १.३५ वाजता बँकेच्या काउंटरजवळ व्यवहार करत होते. त्यांनी २ लाख ३० हजार रुपये असलेली पिशवी काउंटरवर ठेवत आपला क्रमांक येण्याची वाट पाहत होते. याच वेळी त्यांच्या पाठीमागून एकजण आला. बारहाते यांचे समोर लक्ष असल्याचे पाहून संधी साधून त्याने रोख रक्कम असलेली पिशवी अलगद पळवली. घटनेनंतर तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबडमध्ये एसबीआय बँकच्या काउंटरवरून २ लाख ३० हजारांची रक्कम लंपास; पोलिसांचा तपास सुरु #jalana#marathwada#crimenewspic.twitter.com/KnjIdauJ1x
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) July 10, 2025
स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व तपास पथक गुरुवारी बँकेत दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असून, आरोपींच्या ओळखीचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे बँकेतील सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. ग्राहकांच्या पैशांची सुरक्षितता ही बँकेची जबाबदारी असतानाही, सुरक्षा कर्मचारी किंवा प्रणालीच्या असमर्थतेमुळे ही चोरी घडल्याचे स्पष्ट होत आहे. ग्राहकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित बँकेने तात्काळ सुरक्षा उपाययोजना बळकट कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.