पावसाअभावी पिके सुकली; अस्वस्थ शेतकऱ्याने २५ एकर सोयाबीन पिकावर फिरवले रोटाव्हिटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 19:10 IST2021-07-06T19:07:44+5:302021-07-06T19:10:57+5:30
Rain Delay : विहीर कोरडीठाक पडल्याने सोयाबीनला पाणी कसे द्यावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

पावसाअभावी पिके सुकली; अस्वस्थ शेतकऱ्याने २५ एकर सोयाबीन पिकावर फिरवले रोटाव्हिटर
- हुसेन पठाण
आन्वा (जि.जालना) : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे पावसाअभावी सुकून चाललेल्या २५ एकरातील सोयाबीन पिकावर शेतकऱ्याने मंगळवारी रोटाव्हिटर फिरवून पीक उद्ध्वस्त केले आहे.
आन्वा पाडा शिवारात जूनच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाला. या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी व लागवड केली. येथील बबन देशमुख यांनी आन्वा पाडा शिवारातील गट नंबर ३८२ मध्ये २५ एकरात सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणीनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे पीकही चांगले आले. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पीक सुकू लागले. विहीर कोरडीठाक पडल्याने सोयाबीनला पाणी कसे द्यावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. चातकासारखी ते पावसाची वाट पाहत होते. परंतु, महिना उटलूनही पाऊस न पडल्याने सोयाबीनच्या पिकाने माना टाकल्या. शेवटी मंगळवारी त्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने २५ एकरातील सोयाबीन पिकावर रोटव्हिटर फिरवले.
शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरणhttps://t.co/47lcMsOGkx
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) July 6, 2021
आन्वा परिसरात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आन्वा, आन्वा पाडा, कोदा, कारलावाडी, जानेफळ गायकवाड, वाकडी, कोकडी आदी भागांतील शेतकऱ्यांनी बॅंकेडून पीककर्ज घेऊन बी-बियाणे खरेदी केले. बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने सध्या पिके सुकून चालली आहे. शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचे संकट उभे राहिले आहे.
अडीच लाख रुपयांचा खर्च
बबन देशमुख यांना २५ एकर सोयाबीन पेरणीसाठी जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च आला होता. यात बी-बियाणे, खते व पेरणीसाठी लागलेल्या खर्चाचा समावेश आहे. त्यांनी एका बॅंकेकडून पीककर्ज काढून बी-बियाणे व खत खरेदी केले होते. आता हा खर्च कसा काढावा? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे जूनच्या सुरुवातीलाच मी २५ एकरात सोयाबीन पेरली. त्यानंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पीकही चांगले आले होते. परंतु, गेल्या २५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिकाने माना टाकल्या आहे. त्यामुळे रोटव्हिटर फिरवून सोयाबीनचे पीक काढून टाकले.
- बबन देशमुख, शेतकरी, आन्वा पाडा