आन्वा येथील हेमाडपंती शिवमंदिराची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST2021-02-15T04:27:04+5:302021-02-15T04:27:04+5:30

हुसेन पठाण आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील हेमाडपंती शिवमंदिर भाविकांसह पर्यटक, अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहे; परंतु देखभाल दुरुस्तीअभावी या ...

Poor condition of Hemadpanti Shiva Temple at Anwa | आन्वा येथील हेमाडपंती शिवमंदिराची दुरवस्था

आन्वा येथील हेमाडपंती शिवमंदिराची दुरवस्था

हुसेन पठाण

आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील हेमाडपंती शिवमंदिर भाविकांसह पर्यटक, अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहे; परंतु देखभाल दुरुस्तीअभावी या हेमाडपंती मंदिराची मोठी दुरवस्था झाली आहे. झालेली विकासकामेही दर्जेदार झालेली नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.

मराठवाड्यातील ऐतिहासिक मंदिरांपैकी एक म्हणून आन्वा येथील हेमाडपंती शिवमंदिराला (मढ) ओळखले जाते. हे मंदिर चार मीटर उंच उपपीठावर बांधण्यात आले आहे. आन्वा येथे इ.स. १०५० मध्ये मंदिराची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. हे मंदिर (मढ) पर्यटन क्षेत्रात येत असल्याने भाविक व पर्यटक येथे सतत येतात. या मंदिराची सध्या दुरवस्था झाली आहे. मात्र, याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या मंदिराचा काही भाग ढासळण्याच्या मार्गावर आहे. काही वर्षांपूर्वी या मंदिराच्या देखभालीसाठी पुरातन विभागाचा कर्मचारी कार्यरत होता; परंतु दहा वर्षांपासून याठिकाणी कर्मचारी येत नाही. २०१७ मध्ये औरंगाबाद पुरातत्व विभागाने मंदिराच्या दुरुस्तीसाठी एक कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामध्ये मंदिरावरील छत, मंदिरासमोरील ओटा (चबुतरा) व आवारातील दुरुस्ती, काही प्रमाणात नक्षीकाम करण्यात आले होते. मंदिराच्या पाठीमागील चबुतऱ्याचे काम झालेले नाही. केवळ समोरील भागात काम केलेले दिसते. पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या मंदिराची मोठी दुरवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या मंदिराची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

फोटो

Web Title: Poor condition of Hemadpanti Shiva Temple at Anwa