Police seek marriage for runaway bride! | पळून गेलेल्या विवाहितेचे लग्नासाठी पोलिसांना साकडे !

पळून गेलेल्या विवाहितेचे लग्नासाठी पोलिसांना साकडे !

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : पैठण तालुक्यातून आतेभावासोबत पळून आलेल्या विवाहितेने चक्क भोकरदन पोलीस ठाण्यात येऊन त्याच्याशी माझा विवाह करून देण्यासाठी चक्क पोलिसांनाच साकडे घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.
घटनेची माहिती अशी की, एका १९ वर्षीय तरूणीचे (कडेठाण ता. पैठण) येथील २५ वर्षीय तरुणा सोबत सहा महिन्या पूर्वी लग्न झाले होते. हे पती - पत्नी दोघेही कडेठाण येथे वास्तव्य करीत होते. मात्र १९ वर्षीय तरूणीचा जीव दुसरीकडेच गुंतलेला होता. त्यामुळे तिला कडेठाणमध्ये मन लागत नव्हते. तिचे ढोरकीण येथील आतेभावासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे ती नेहमी त्याच्या संपर्कात होती, शेवटी सोबत जगण्याच्या व सोबत राहण्याच्या घेतलेल्या आणाभाका तिला काही कडेठाण येथे राहू देत नव्हत्या. शेवटी १४ जानेवारी रोजी सदर विवाहित तरूणी तिच्या २५ वर्षीय आतेभावा सोबत कडेठाण येथून पळून जाण्याचा निर्णय घेऊन कठेठाण सोडले.
परंतु आता कोठे जावे, काय करावे, विवाह कोठे करावा असे प्रश्न त्यांच्या समोर पडला होता, मात्र तिच्या आतेभावाचा मित्र भोकरदन तालुक्यातील मलकापूर येथे होता, हे दोघेही १४ जानेवारीला त्याच्या घरी आले व दोन दिवस मुक्काम केला. मात्र मित्राला त्याने ही तरूणी पळून आणल्याचा प्रकार कळल्यावर त्याने या प्रेमीयुगुलास १५ जानेवारी रोजी रात्री भोकरदन पोलीस ठाण्यात हजर केले. त्यावेळी सदर विवाहित तरूणीने आपला विवाह हा आपल्या सोबत असलेल्या आतेभावासोबतच करून द्यावा असा हट्ट धरल्याने पोलीसही अचंबित झाले. एका विवाहित मुलीचा दुसऱ्या सोबत विवाह कसा लावावा, हा त्यांच्यासमोर यक्षप्रश्न पडला होता. त्या तरूणीने निरीक्षक दशरथ चौधरी यांना सांगितले की माझ्या आई - वडिलांनी माझ्या मनाविरूध्द विवाह केला होता, ते पती मला पसंत
नाही, तुम्ही माझा विवाह माझ्या आतेभावासोबत लावून द्यावा नंतरच आम्ही ठाणे सोडू असा हट्ट धरला. यावेळी निरीक्षक चौधरींनी त्यांची समजूत काढली. जोपर्यंत पतीसोबत घटस्फोट होत नाही, तोपर्यंत दुसरा विवाह करता येणार नाही असे सांगून, रात्रभर ठाण्यातच ठेवून घेतले. याची माहिती पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना देऊन ठाण्यात गुरूवारी बोलावून घेतले. यावेळी विवाहितेला त्यांच्या स्वाधीन केल्याची माहिती निरीक्षक चौधरी यांनी दिली. या प्रकाराने पोलीसही चक्रावून गेले होते.

Web Title: Police seek marriage for runaway bride!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.