जालना : माता मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सप्टेंबर २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत चार वर्षांत जिल्ह्यातील ४२ हजारांवर मातांना लाभ देण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या या योजनेची जनजागृती व्हावी, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत पोस्टर प्रदर्शन, पथनाट्यासह इतर विविध माध्यमातून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत मागील चार वर्षांत जवळपास ४२ हजार ७३५ लाभार्थ्यांना १६ कोटी, ६५ लाख, ३० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. चालू वर्षात ३७२३ महिलांची नोंदणी झाली आहे. तर आजवर एक कोटी, ६३ लाख, ५४ हजारांचे वाटप करण्यात आले आहे. ही योजना माता मृत्यूदर रोखण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे या योजनेचा जिल्ह्यातील लाभार्थी मातांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आरोग्य सभापती पूजा सपाटे यांनी केले आहे.
तीन टप्प्यांत मिळणार पैसे
योजनेत एकूण पाच हजार रुपये मिळतात. पहिला टप्पा नोंदणी केल्यानंतर एक हजार, गर्भधारणेचे सहा महिने झाल्यानंतर दोन हजार रुपये व प्रसूती झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात दोन हजार रुपये दिले जातात.
पात्रतेचे निकष काय?
शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळता १ जानेवारी २०१७ नंतर प्रथम माता होणाऱ्या इतर सर्वच महिलांसाठी ही योजना लागू आहे. शासकीय निकषात बसणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ दिला जातो.
लाभासाठी कोठे करायचा संपर्क?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेविका, जवळील शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा. तेथे आवश्यक ती माहिती भरून नोंदणी करावी. नोंदणीनंतर या योजनेचा संबंधित महिलेला लाभ दिला जातो.
योजना लाभदायक
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही महत्त्वाची योजना आहे. मातामृत्यू रोखणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनी नोंदणी करून या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा.
- डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी