दोन महिन्यांपूर्वी तिसरे लग्न केले, नराधम बापाने प्रोपर्टीसाठी स्वतःच्याच मुलाला संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 15:28 IST2021-09-16T15:26:34+5:302021-09-16T15:28:03+5:30
Father Kills Son for Property : नराधम बापाने जमिनीच्या हव्यासापायी स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलाचा गळा घोटला

दोन महिन्यांपूर्वी तिसरे लग्न केले, नराधम बापाने प्रोपर्टीसाठी स्वतःच्याच मुलाला संपवले
बीड : तीन विवाह केल्यानंतर पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावे असलेली जमीन स्वत:ला मिळावी यासाठी जन्मदात्याने १३ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील खडकीघाट येथे १५ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी या नराधम पित्याला जेरबंद केले आहे. ( Married for the third time two months ago, ending the first wife's 13-year-old son for the property)
राकेश उमेश वाघमारे (वय १३, रा. खडकीघाट, ता. बीड) असे मृत मुलाचे नाव आहे. १५ सप्टेंबर रोजी सकाळी खडकी घाट येथील वस्तीवरील घरात राकेशचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. राकेशचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्यातच त्याचा पिता उमेश पहाटेपासून गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुस्तफा शेख यांनी तपासचक्रे गतिमान केली. उमेश बसने पाटोद्याहून पुण्याकडे जात असल्याचे समजल्यावर नेकनूर व पाटोदा पोलिसांनी बसस्थानकात सापळा रचून त्यास बेड्या ठोकल्या. पोलिसांनी पंचनामा करून राकेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपीने खुनाची कबुली दिली असून, त्यास आज, गुरुवारी न्यायालयात हजर केले जाईल, असे सहायक निरीक्षक शेख मुस्तफा यांनी सांगितले.
हेही वाचा - मराठवाड्याला १३९ मि.मी.अतिरिक्त पावसाचा तडाखा; १५ लाख हेक्टरवरील पिके चिखलात
असा रचला कट
आरोपी उमेशने तीन विवाह केलेले आहेत. त्याची पहिली पत्नी त्याला साेडून गेली, तर दुसरीने आत्महत्या केली. दोन महिन्यांपूर्वीच त्याने तिसरा विवाह केला होता. तो बीड शहरात वास्तव्यास असे. राकेश हा त्याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता. तो गावी खडकीघाट येथील वस्तीवर आजी-आजोबांकडे राहत असे. राकेशच्या नावावर काही जमीन आहे. राकेशला संपविल्यानंतर ही जमीन आपल्याला मिळेल, म्हणून उमेशने त्याच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी तो मंगळवारीच (दि. १४) खडकीघाट येथे मुक्कामी आला. मध्यरात्रीनंतर त्याने झोपेत राकेशचा गळा आवळून पोबारा करण्याचा प्रयत्न केला.