Jalana: भोळसर बापाचा आधार हिरावला! अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:59 IST2026-01-12T12:58:05+5:302026-01-12T12:59:26+5:30
अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली, ज्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

Jalana: भोळसर बापाचा आधार हिरावला! अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
वडीगोद्री (जि. जालना): वडीगोद्री-जालना मार्गावर रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर भगवान हगारे (रा. वडीगोद्री, ता. अंबड) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. आपल्या भोळसर वडिलांचा एकमेव आधार असलेला हा तरुण कामावरून घरी परतत असताना काळाने त्याच्यावर झडप घातली.
नेमकी घटना काय?
मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर हा आपल्या दुचाकीने (क्र. MH 21 BS 5863) कामावरून घराकडे निघाला होता. वडीगोद्री पेट्रोल पंपाजवळ तो पोहोचला असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ज्ञानेश्वरचा जागीच प्राण गेला. घटनेनंतर चालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.
वडिलांचा आधार हरपला
अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली, ज्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. गोंदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवला. ज्ञानेश्वर हा अत्यंत कष्टाळू मुलगा होता. आपल्या वडिलांच्या प्रकृतीमुळे तो दिवसभर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. त्याच्या निधनाने हगारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.