Jalana: अंबडमध्ये वाळू माफियांचा हैदोस, थेट तहसीलदारांवरच ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 19:44 IST2025-09-10T19:44:29+5:302025-09-10T19:44:50+5:30
वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला, स्थानिकांच्या मदतीने आरोपींना पकडण्यात यश

Jalana: अंबडमध्ये वाळू माफियांचा हैदोस, थेट तहसीलदारांवरच ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न
अंबड: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस सुरू असून, त्यांच्या मुजोरीची हद्द पार करणारी एक धक्कादायक घटना आज घडली. दुधना नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांना पकडण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने, या जीवघेण्या हल्ल्यातून तहसीलदार बचावले असून, स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे महसूल आणि पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
आज दुपारी अंबड तालुक्यातील घोटण परिसरात दुधना नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार विजय चव्हाण यांनी तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. महसूल पथक येत असल्याचे पाहून वाळू माफियांनी ट्रॅक्टरसह पळ काढण्यास सुरुवात केली.
जीवे मारण्याचा प्रयत्न
तहसीलदार विजय चव्हाण यांनी तात्काळ आपल्या पथकासह पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असतानाच, एका वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाने वेग वाढवला आणि थेट तहसीलदार चव्हाण यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला इतका जीवघेणा होता की, थोडक्यात बचावल्याने चव्हाण यांना मोठी दुखापत झाली नाही.
गावकऱ्यांच्या मदतीने यश
वाळू माफियांचा हा थरार पाहून स्थानिक गावकरी धावून आले आणि त्यांनी तहसीलदारांना मदत केली. गावकऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे महसूल पथकाला अखेर काही संशयितांना पकडण्यात यश आले. या घटनेमुळे वाळू माफिया किती निर्ढावलेले आहेत आणि ते कायदा आणि सुव्यवस्थेची पर्वा करत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी महसूल पथकाने ट्रॅक्टरसह अवैध वाळूचा साठा जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या घटनेनंतर प्रशासनाने अवैध वाळू उत्खननाविरोधात अधिक कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या माफियांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.