Jalana: धार्मिक कार्यक्रमासाठी जाताना अपघात; चारचाकी वाहनाच्या धडकेने बाप लेकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:49 IST2026-01-09T18:47:54+5:302026-01-09T18:49:12+5:30
या अपघातात आणखी एकजण जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत

Jalana: धार्मिक कार्यक्रमासाठी जाताना अपघात; चारचाकी वाहनाच्या धडकेने बाप लेकाचा मृत्यू
बदनापूर : तालुक्यातील राजूर ते हसनाबाद फाटा रस्त्यावर असलेल्या सुंदरवाडीजवळ बुधवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या एका अपघातात बदनापूर येथील बाप-लेकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजूर ते हसनाबाद फाट्यादरम्यान असलेल्या सुंदरवाडी जवळ एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला (एमएच २० सीइ ९१२५) जोरदार धडक दिली. बदनापूर येथून हसनाबाद येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी जात असलेले शेख अजीम शेख नसीर (वय ४०) आणि शेख वसीम शेख अजीम (वय १९) हे या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी शेख अजीम यांना मृत घोषित केले. त्यांचा मुलगा शेख वसीम याचाही रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघातात आणखी एकजण जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस हेडकॉन्स्टेबल नितीन वाघमारे यांनी दिली. मृत शेख अजीम हे सामान्य कुटुंबातील होते. ते हमालीचे काम करत असल्याने सर्वपरिचित होते. तसेच, स्थानिक कब्रस्तानामध्ये निस्वार्थ भावनेने कबर खोदण्याचे सेवाभावी कार्य ते करत असत, ज्यामुळे त्यांना समाजात आदराचे स्थान होते. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे बदनापूर शहरात शोककळा पसरली आहे.