लॉकडाऊनमध्ये हिरमुसलेली फुले डोलू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:59+5:302021-02-13T04:29:59+5:30

फुलशेतीने टाकली कात : जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून मागणी शेषराव वायाळ परतूर : लॉकडाऊन शिथिलतेमुळे आता धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रम सुरू ...

Hiramusleli flowers began to sway in the lockdown | लॉकडाऊनमध्ये हिरमुसलेली फुले डोलू लागली

लॉकडाऊनमध्ये हिरमुसलेली फुले डोलू लागली

फुलशेतीने टाकली कात : जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून मागणी

शेषराव वायाळ

परतूर : लॉकडाऊन शिथिलतेमुळे आता धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रम सुरू झाले असून, फुलांनाही मागणी वाढली आहे. फुलांची मागणी वाढल्याने फुलशेतीनेही कात टाकली असून, लॉकडाऊनमुळे हिरमुसलेली फुले आता डोलू लागली आहेत.

परतूर तालुक्यातील अनेक शेतकरी विविध जातींच्या फुलांची शेती करतात. जालन्यासह औरंगाबाद, नाशिक, नांदेड व इतर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये तालुक्यातील फुलांची विक्री होते. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात सर्वच व्यवसायाबरोबर शेती व्यवसायावरही परिणाम झाला होता. धार्मिक कार्यक्रम बंद पडल्याने फुलांची मागणी घटली होती. लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला, टरबूज, खरबूज, मोसंबीला ग्राहक नसल्याने, यावर नांगर फिरविण्याची वेळ आली होती. भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी गुलाब, पिवळा गलांडा, शेवंती आदी फुलांच्या शेतीवर नांगर फिरविला, तर काहींनी शेतातच बहरलेली फुले तोडून टाकली होती. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. धार्मिक, सामाजिक कार्यक्रमही सुरू झाले आहेत. त्यामुळे फुलांची मागणी वाढली असून, कोमेजलेल्या फुलशेतीने कात टाकली आहे. लग्न समारंभ व मोठे कार्यक्रम, उत्सव सुरू झाल्याने विविध जातींच्या फुलांना मागणी वाढली आहे. सध्या बाजारात गुलाब १८० रुपये, बिजली पांढरी ६० रुपये, पिवळा गलांडा ४० ते ५० रुपये दराने मिळत आहे, तर सर्वाधिक काकडाला ३५० रुपयापर्यंत भाव मिळत आहे. मागील महिन्यापासून या फुलांना मागणी वाढली आहे. फुलांना मागणी वाढल्याने फुलांची शेती करणारे शेतकरी व या फुलांवरील आधारित व्यवसायावरील मरगळ दूर होऊ लागली आहे.

उपासमारीची वेळ आली होती

कोरोनामुळे सर्वच कार्यक्रम बंद झाले आणि फुलांची मागणी घटली. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली होती. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने फुलांना मागणी वाढली आहे. बाजारात फुलांना दरही चांगला मिळत आहे.

अशोक काळे

फुले व्यावसायिक, परतूर

इतर जिल्ह्यांतूनही मागणी

लॉकडाऊन शिथिलतेनंतर आता फुलांना मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे, जालना जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील व्यापारीही मागणी करीत आहेत. त्यामुळे फुल उत्पादकांच्या अडचणी काही अंशी दूर होण्याची आशा आहे.

भीमाराव खामकर

फुले उत्पादक, आनंदवाडी

Web Title: Hiramusleli flowers began to sway in the lockdown