पाण्याअभावी फुलशेती धोक्यात..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:47 IST2019-05-27T00:47:21+5:302019-05-27T00:47:48+5:30
फळबाग, फुलशेतीला वेळेत पाणी देण्यास अडचणी येत असल्याने फुलशेती धोक्यात आली आहे. फुलांनी माना टाकण्यास सुरूवात केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

पाण्याअभावी फुलशेती धोक्यात..!
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालुक्यात उन्हाची तिव्रता वाढली असून, भूजल पातळीत झपाट्याने खालावत आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने फुले शेती आणि फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. फळबाग, फुलशेतीला वेळेत पाणी देण्यास अडचणी येत असल्याने फुलशेती धोक्यात आली आहे. फुलांनी माना टाकण्यास सुरूवात केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
तालुक्यात वलखेड, शेवगा, सालगाव, बाबई, परतूर शिवाराचा काही भाग, चिंचोली आदी गावात विविध प्रकारच्या फुलांची शेती केली जाते. फुलशेती म्हणजे नगदी पैसा मिळवून देणारा व्यवसाय असल्याने अनेक शेतकरी फुलाच्या लागवडीकडे वळले आहेत. तालुक्यातील शेवंती, मोगरा, गुलाब, केवडा आदी फुलांना मराठवाड्यासह बाहेरील हैदराबाद राज्यात सुध्दा मागणी असते. अनेक वर्षांपासून या तालुक्यात फुलांची शेती करतात.
यावर्षी कुठल्याच शेतमालास भाव नाही. त्यातच विहिरींची पाणीपातळी कमी झाल्याने फुलशेतीला पुरेसे पाणी देण्यास अडचणी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या लग्नसराई असल्याने फुलशेतीतून हाती पैसा येईल, अशी आशा शेतक-यांना होती. मात्र, पाण्याअभावी कळ्या सुकू लागल्याने शेतक-यांच्या आशेवरच पाणी फिरले आहे.
खर्च करूनही हाती फारशी मिळत येणार नसल्याचे जाणवू लागल्याने शेतक-यांमध्ये नाराजी आहे. आता लागवडीचा खर्चही निघतो की नाही, याची चिंता शेतक-यांना सतावत आहे.