'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 19:38 IST2025-10-18T19:35:34+5:302025-10-18T19:38:32+5:30
मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भूमिकेचे समर्थन करत ओबीसी नेत्यांवर सडकून टीका

'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
वडीगोद्री (जालना): मराठा आरक्षणाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी महा एल्गार सभेला गैरहजर राहिलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भूमिकेचे समर्थन करत ओबीसी नेत्यांवर सडकून टीका केली आहे. 'बापजाद्यांची पायवाट मोडू नये,' असे म्हणत जरांगे यांनी पंकजा मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला मराठा समाजाने दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली.
पंकजा मुंडे 'चक्रव्यूहा'तून बाहेर
पंकजा मुंडे ओबीसी महा एल्गार सभेला गैरहजर राहिल्याबद्दल जरांगे पाटील म्हणाले की, "त्यांना (पंकजा मुंडे) ओबीसी मेळाव्याचा चक्रव्यूह नकोच वाटत असेल. आपल्याकडून वाकडा पाय पडायला नको, असे त्यांना वाटले असेल." ते पुढे म्हणाले की, "त्यांना आपल्या बापाची (गोपीनाथ मुंडे) पायवाट मोडायची नसेल. त्यांनी समाज एका उंचीवर नेला आणि त्यांचा वारसा त्यांना चालवायचा आहे. पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाविरोधात बोलू नये, मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याच्या आड येऊ नये, हे महाराष्ट्र आणि बीडमधील मराठ्यांचे मत आहे. पंकजाताईंनी यात सुधारणा केली आहे आणि त्या या 'फसवणाऱ्या चक्रव्यूहातून' बाहेर पडल्याचे दिसत आहे."
भुजबळांचे चक्रव्यूह विषारी
छगन भुजबळ यांच्यावर जरांगे यांनी अतिशय तिखट शब्दांत टीका केली. "छगन भुजबळ यांचे चक्रव्यूह प्रचंड घातक आणि विषारी आहे. यात गुंतले की बाहेर निघता येत नाही," असे त्यांनी ठणकावले. भुजबळ यांना गोपीनाथ मुंडे यांचा वारसा 'रक्ताने बरबटलेल्या हातात' द्यायचा असेल, असा गंभीर आरोप त्यांनी केला. "चांगल्या नावाला डाग लावणे, हे त्यांचे काम आहे," अशी बोचरी टीका जरांगे यांनी केली.
धनंजय मुंडेंवर थेट निशाणा
जरांगे यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, "त्यांना (धनंजय मुंडे) राजकारणाचे करिअर एव्हढे सोपे नाही. त्यांना वाटत असेल आपण निवडून आलो, तर आणखी दिवस मराठ्यांच्या हातात आहेत." दरम्यान, "धनंजय मुंडे आता संपले आहेत," असे म्हणत जरांगे पाटील यांनी यापुढे त्यांच्यावर बोलून संपलेल्या व्यक्तीला मोठे करायचे नाही, असे जाहीर केले.
अजित पवारांनी आताच हुशार व्हावे
यावेळी जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर बोलताना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही सल्ला दिला. भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे का, या प्रश्नावर जरांगे म्हणाले, "यांनीच (ओबीसी नेत्यांनी) अजित पवारांचा राजीनामा घेऊ नये, इतके नालायक हे एका जागेवर जमले आहेत. त्यामुळे अजित दादांनी हुशार राहणे गरजेचे आहे." शरद पवार यांनीच ओबीसींना आरक्षण दिले, याचे स्मरण करून देत जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली. "देणाऱ्याला विसरणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. जे शरद पवार यांना विसरले, ते अजित दादांचे उपकार कसे ठेवतील?" असा सवाल त्यांनी केला. अजित पवारांनी या विषारी राजकारणापासून आताच सावध व्हावे, असा मोलाचा सल्ला जरांगे यांनी दिला.