'धनंजय मुंडे इतका नीच...!' मनोज जरांगेंचा संताप शिगेला; फडणवीस-पवारांना दिला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 18:59 IST2025-11-24T18:54:31+5:302025-11-24T18:59:21+5:30
अशा माणसाला किती दिवस फडणवीसांनी आणि अजित पवारांनी पाठीशी घालायचं?

'धनंजय मुंडे इतका नीच...!' मनोज जरांगेंचा संताप शिगेला; फडणवीस-पवारांना दिला थेट इशारा
- पवन पवार
वडीगोद्री (जालना): संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येवरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत कठोर टीका केली आहे. "संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करूनही जर तो (धनंजय मुंडे) म्हणत असेल की मला 'त्याची' उणीव भासती, तर त्याच्या इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर दुसरा असू शकत नाही," असे संतप्त उद्गार जरांगे पाटील यांनी काढले.
एका सभेत धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराड यांची आठवण करून 'इथे एक माणूस नाही त्याची आठवण येते, त्याची चूक काय होती त्याचा न्यायालयात न्याय होईल,' असे अप्रत्यक्ष विधान केले होते. यावर जरांगे पाटील यांनी मुंडे यांच्यावर सडकून टीका केली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही सुनावलं आहे. "जर तो गोरगरीब लेकरांचे मुडदे पाडत असेल तर अशा माणसाला किती दिवस फडणवीसांनी आणि अजित पवारांनी पाठीशी घालायचं? आता तरी अजित पवारांचे डोळे उघडले तर बरं होईल," असे जरांगे म्हणाले. "तो जर तसं म्हणत असेल तर लोकांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, की तो किती पापी वृत्तीतून आणि गुंडगिरीतून पैसा आणि राजकारण उभा करत होता," असा सवाल देखील त्यांनी केला.
'पापात तुम्हीही खाक व्हाल'; फडणवीस-पवारांना इशारा
जरांगे पाटील यांनी यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख करत, फडणवीस आणि अजित पवार यांना मोठा इशारा दिला. "अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना सांगतो, संतोष भैय्यांच्या केसमध्ये एकही आरोपी सुटला तर याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत. त्याच्या पापा मध्ये तुम्ही देखील खाक व्हाल." बीड जिल्ह्यातील जेलर यांनी तर बदलला नसेल ना? असा सवाल करत जरांगे यांनी या केसवर अजित पवारांच्या जीवावर १००% दबाव असण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप केला.
'नार्को टेस्ट करायला चला'
जरांगे पाटील यांनी "असा गुंड आणि टोळ्या सांभाळणारा माणूस जनतेसाठी घातक आहे. त्याला सरकारने तात्काळ जेरबंद करायला पाहिजे," अशी मागणी करत, "माझ्या मॅटरमध्ये चल ना नार्को टेस्ट करायला," असे आव्हान पुन्हा एकदा दिले आहे.