मृत्यूशी गाठ! पेटत्या हायवामधून चालक-मजुराची उडी; वडीगोद्री-जालना महामार्गावर थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:23 IST2026-01-13T16:23:00+5:302026-01-13T16:23:43+5:30
वडीगोद्रीजवळ धावत्या ट्रकने घेतला पेट; चालक आणि मजुराच्या समयसूचकतेने टळली मोठी जीवितहानी

मृत्यूशी गाठ! पेटत्या हायवामधून चालक-मजुराची उडी; वडीगोद्री-जालना महामार्गावर थरार
- पवन पवार
वडीगोद्री (जि. जालना): शहागड येथून जालन्याकडे विटा घेऊन जाणाऱ्या एका हायवा ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. वडीगोद्री-जालना मार्गावरील डाव्या कालव्याजवळ ही घटना घडली असून, आगीने रौद्र रूप धारण केल्याने ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवाने, हायवा चालक आणि सोबत असलेल्या मजुराने पेटत्या ट्रकमधून वेळीच उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला.
नेमकी घटना काय?
शहागड येथील वीट उत्पादक ऋषीकेश वसंत सापटे यांचा हायवा (क्र. MH 12 PQ 9016) विटा घेऊन जालन्याकडे निघाला होता. वडीगोद्री कालव्याजवळ पोहोचल्यावर ट्रकच्या समोरील भागातून अचानक धूर निघू लागला आणि क्षणात आगीचे लोळ उठले. हे बघताच चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक लावला आणि मजुरासह तात्काळ बाहेर उडी मारली. महामार्गावर आग विझवण्यासाठी कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने आगीने संपूर्ण ट्रक कचाट्यात घेतला.
वडीगोद्रीजवळ आगीचं तांडव! धावत्या हायवा ट्रकने घेतला पेट, चालक आणि मजूर थोडक्यात बचावले. #jalana#marathwadapic.twitter.com/rP1ANAuah2
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) January 13, 2026
लाखोंचे नुकसान, वाहतूक विस्कळीत
या भीषण आगीत ट्रकचे इंजिन आणि केबिन पूर्णपणे जळून खाक झाले असून मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीच्या लोळामुळे आणि धुरामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शॉर्ट सर्किट किंवा इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.