मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; जुना सहकारीच निघाला संशयित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 14:07 IST2025-11-07T14:06:15+5:302025-11-07T14:07:24+5:30
या प्रकरणी गेवराई तालुक्यातील अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोन संशयित आरोपींना जालना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; जुना सहकारीच निघाला संशयित
- पवन पवार
वडीगोद्री (जालना): मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा गंभीर कट उघडकीस आल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अडीच कोटी रुपयांची सुपारी देऊन हा घातपाताचा कट रचण्यात आला असल्याची तक्रार जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी रात्री पोलीस अधीक्षकांकडे दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत गेवराई तालुक्यातील दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, गुरुवारी रात्री त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गेवराई तालुक्यातील अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोन संशयित आरोपींना जालना स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी मध्यरात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक आरोपी हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचे समोर आले आहे. जरांगे पाटील यांच्या अत्यंत जवळचा माणूसच या कटात सामील असल्याचे उघड झाल्याने या घटनेमागील राजकीय सूड आणि वैयक्तिक हेतू तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
बीडमध्ये रचला कट
जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा हा कट बीड जिल्ह्यातील एका बैठकीत रचण्यात आला होता. या बैठकीत उपस्थित असलेल्या एका समर्थकाने जरांगे पाटील यांना ही गंभीर बाब सांगितल्यानंतर जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी बुधवारी (५ नोव्हेंबर) रात्री पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. स्वःत जरांगे पाटील यांनीही मध्यरात्री पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. जरांगे पाटील यांनी या प्रकरणाचे गांभीर्य व्यक्त करताना, "माझ्या खुनाचा कट रचला गेला, हे सत्य आहे," असे स्पष्ट केले आहे.
सुरक्षेत वाढ, मोठा अनर्थ टळला
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक बन्सल यांनी तातडीने पथकाच्या माध्यमातून गेवराईतून संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी तत्परता दाखवल्याने पुढील मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्यात आली आहे. या कटामागील मुख्य सूत्रधार आणि राजकीय संबंधांचा तपास पोलीस कसून करत आहेत.
मनोज जरांगे यांचा थेट धनंजय मुंडेंवर आरोप
जरांगे पाटील यांनी थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. जरांगे पाटील याबाबत म्हणाले, हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी ठरली होती, त्यापैकी ५० लाख रुपये देण्यात आले होते. बीडमधील कांचन नावाचा व्यक्ती धनंजय मुंडे यांचा पीए (कार्यकर्ता) आहे. त्याने दोन आरोपींपैकी एका आरोपीला त्याने परळीला नेले होते. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी झाल्टा फाटा येथे धनंजय मुंडे यांनी या आरोपींची भेट घेतली. 'आम्ही त्याला ठोकतो' असे आरोपींनी सांगितल्यावर, मुंडे यांनी 'मी जुनी गाडी देतो' असे आश्वासन दिले. "या घातपाताच्या कटाचे मूळ धनंजय मुंडे आहे.'' असा दावा जरांगे यांनी केला. जरांगे पाटील यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगताना, मराठा समाजाने शांत राहण्याचे आणि राज्यातील सर्व नेत्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे.