भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 06:11 IST2025-08-17T06:10:37+5:302025-08-17T06:11:36+5:30

रशियाने भारतासारखा मोठा तेलग्राहक गमावला आहे, असेही ते म्हणाले

Will not impose secondary tariffs on India says US President Donald Trump hints | भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत

भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत

न्यूयॉर्क: रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवणाऱ्या देशांवर विशेषतः भारतावर अमेरिका दुय्यम आयात शुल्क लावणार नाही, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दिले आहेत. हे अतिरिक्त शुल्क लागू केले असते तर त्याचा भारतावर मोठा परिणाम झाला असता, असेही त्यांनी सांगितले.

ट्रम्प म्हणाले की, रशियाने भारतासारखा मोठा तेलग्राहक गमावला आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत होता. चीनदेखील रशियाकडून बऱ्याच गोष्टी घेत आहे. जर मी दुय्यम आयात शुल्क किंवा निर्बंध लादले तर या देशांसाठी ते विनाशकारी ठरेल. पण असे पाऊल उचलण्याची वेळ आली तर मी अजिबात मागे हटणार नाही. पण कदाचित असा निर्णय घेण्याची वेळ येणार नाही असे वाटते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत शिखर परिषदेसाठी ट्रम्प अलास्का येथे निघाले असताना त्यांनी विमानात पत्रकारांना मुलाखत दिली. त्यात त्यांनी हे वक्तव्य केले.

ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के शुल्क आकारले असून, त्यात रशियन तेल खरेदीसाठी २५ टक्के शुल्काचा समावेश आहे. हे शुल्क २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. त्याबाबत भारताने म्हटले होते की, भारताला लक्ष्य करणे अन्यायकारक आहे. (वृत्तसंस्था)

युद्ध भारत-पाकिस्तान थांबविल्याचा पुन्हा दावा

  • भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध मीच थांबविले असा दावा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. विमानात त्यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी आतापर्यंत सहा युद्धे थांबविली आहेत. भारत-पाकिस्तानमधील संभाव्य युद्धाच्या मुद्द्याचा त्यात समावेश आहे.
  • काँगो-रवांडा, थायलंड-कंबोडिया, आर्मेनिया-अझरबैजान यांच्यातील संघर्षांचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, भारत व पाकिस्तान संघर्षात त्यांनी एकमेकांची विमाने पाडली. त्यांनी अणुयुद्धही केले असते. परंतु, अमेरिकेने या गोष्टी वेळीच रोखल्या.

Web Title: Will not impose secondary tariffs on India says US President Donald Trump hints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.