बलूचिस्तानमध्ये धोबीपछाड अन् पाकला आठवला काश्मीर! बीएलएने २०० सैनिक मारल्यानंतर इशाक डार म्हणतात..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:26 IST2026-02-05T16:25:29+5:302026-02-05T16:26:15+5:30
स्वतःच्या देशात सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असताना, आता जगाचे लक्ष भरकटवण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा एकदा 'काश्मीर'चा जुना राग आळवण्यास सुरुवात केली आहे.

बलूचिस्तानमध्ये धोबीपछाड अन् पाकला आठवला काश्मीर! बीएलएने २०० सैनिक मारल्यानंतर इशाक डार म्हणतात..
बलूचिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी लष्कराची अक्षरश: दाणादाण उडवली आहे. एकामागून एक होत असलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तान सरकार सध्या असहाय झाले आहे. २०२५ मध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याचे २०० हून अधिक जवान मारल्याचा दावा केला असून, या वर्षाच्या सुरुवातीला 'ऑपरेशन हेरोफ'द्वारे आपली ताकद दाखवून दिली आहे. स्वतःच्या देशात सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असताना, आता जगाचे लक्ष भरकटवण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा एकदा 'काश्मीर'चा जुना राग आळवण्यास सुरुवात केली आहे.
काय म्हणाले पाकचे उपमुख्यमंत्री?
'काश्मीर एकता दिना'चे औचित्य साधून पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी पुन्हा एकदा भारतावर गरळ ओकली आहे. २०१९ नंतर जम्मू-काश्मीरमध्ये भारताने घेतलेल्या निर्णयांवर त्यांनी टीका केली असून, काश्मीरला राजकीय आणि राजनैतिक पाठिंबा देण्याचे जुनेच तुणतुणे वाजवले आहे. मात्र, बलूचिस्तानमध्ये पिटल्यामुळे आलेले अपयश लपवण्यासाठीच ही धमकी दिली जात असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात रंगली आहे.
बलूचिस्तानमध्ये परिस्थिती हाताबाहेर!
पाकिस्तान सरकारच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये बलूचिस्तानमध्ये ४३२ हून अधिक हिंसक घटना घडल्या आहेत. यामध्ये २४८ नागरिक आणि २०५ सुरक्षा रक्षक मारले गेले आहेत. बीएलएच्या वाढत्या प्रभावामुळे चीननेही ग्वादरमधील आपला कॅम्प तात्पुरता बंद केला आहे. बीएलएला दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी आता पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात धाव घेतली आहे, जे त्यांच्या पराभवाचेच लक्षण मानले जात आहे.
भारताचे चोख प्रत्युत्तर
भारताने नेहमीच स्पष्ट केले आहे की, जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत आणि अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानला या विषयावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. आपल्या देशातील बंडखोरी आणि आर्थिक दिवाळखोरीवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानचे राज्यकर्ते वारंवार काश्मीर मुद्द्याचा वापर प्रोपगंडा म्हणून करत आहेत.
लष्करी ताकद वाढवूनही ड्रॅगन नाराज
चीनच्या वाढत्या दबावामुळे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री बलूचिस्तानमध्ये सैनिकांची संख्या वाढवण्याची भाषा करत आहेत. मात्र, जमिनीवरची हकीकत अशी आहे की, पाकिस्तानी लष्कर आता बलूच लढवय्यांसमोर टिकताना दिसत नाहीये. अशा परिस्थितीत काश्मीरवर भाष्य करणे म्हणजे स्वतःच्या जखमेवर फुंकर घालण्यासारखा प्रकार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.