युक्रेनच्या २ मोठ्या शहरांवर रशियाचा भीषण हल्ला; १३ जण जखमी, कीवचे महापौर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 09:15 IST2026-01-24T09:15:08+5:302026-01-24T09:15:57+5:30
Russia And Ukrain : रशियाने युक्रेनच्या सर्वात मोठ्या दोन शहरांना आता लक्ष्य केलं असून या हल्ल्यात १३ जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

युक्रेनच्या २ मोठ्या शहरांवर रशियाचा भीषण हल्ला; १३ जण जखमी, कीवचे महापौर म्हणाले...
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध गेल्या ४ वर्षांपासून सुरू आहे. अद्याप युद्धविरामाबाबत कोणतीही सहमती झालेली नाही. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत. याच दरम्यान, रशियाने युक्रेनच्या सर्वात मोठ्या दोन शहरांना आता लक्ष्य केलं असून या हल्ल्यात १३ जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी युक्रेनच्या दोन मोठ्या शहरांवर रशियाने हल्ले केले. यामध्ये राजधानी कीवमध्ये २ आणि ईशान्येकडील खार्किवमध्ये ११ जण जखमी झाले आहेत. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीत जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजधानीचे दोन भाग करणाऱ्या नीप्रो नदीच्या दोन्ही काठांवरील जिल्ह्यांमध्ये हे हल्ले झाले आहेत.
क्लिट्स्को यांनी टेलिग्रामवर म्हटलं की, "कीववर शत्रूचा मोठा हल्ला सुरू आहे." युक्रेनच्या वायुसेनेने माहिती दिली की, राजधानीवर झालेल्या या हल्ल्यात ड्रोन आणि क्षेपणास्त्रे अशा दोन्ही शस्त्रांचा वापर करण्यात आला. कीव लष्करी प्रशासनाचे प्रमुख तैमूर तकाचेंको यांनी किमान ३ जिल्ह्यांमध्ये ड्रोन हल्ले झाले असून किमान २ ठिकाणी आग लागली असल्याचं सांगितलं.
नवीन वर्ष सुरू झाल्यापासून कीववर झालेले हे दोन मोठे हल्ले आहेत. यामुळे शेकडो निवासी इमारतींमधील वीज आणि हीटिंग व्यवस्था ठप्प झाली आहे. आपत्कालीन कर्मचारी रहिवाशांच्या सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रात्रीच्या वेळी तापमान -१३°C पर्यंत खाली घसरलं होतं. सीमेपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या खार्किववरही रशियाने निशाणा साधला. खार्किवचे महापौर इगोर तेरेखोव यांनी सांगितलं की, रशियन ड्रोननी अनेक जिल्ह्यांवर हल्ले केले, ज्यामध्ये ११ जण जखमी झाले.
महापौर इगोर तेरेखोव यांनी टेलिग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, ड्रोननी विस्थापित लोकांसाठीचं वसतिगृह, एक रुग्णालय आणि प्रसूतिगृहावर हल्ला केला. हे हल्ले अशा वेळी झाले आहेत जेव्हा युक्रेन, रशिया आणि अमेरिकेचे वार्ताकार संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये ४ वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करत आहेत.