अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या एका अनपेक्षित घोषणेने जगाला चकित केले आहे. "ग्रीनलँडमध्ये अनेक लोक आजारी आहेत आणि त्यांना उपचारांची गरज आहे," असा दावा करत ट्रम्प यांनी तिथे एक 'हॉस्पिटल शिप' पाठवण्याची घोषणा केली आहे. डेन्मार्कचा भाग असलेल्या ग्रीनलँडवर अमेरिकेचा डोळा असल्याच्या चर्चा जुन्याच आहेत, अशातच ट्रम्प यांच्या या नव्या खेळीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सोशल मीडियावरून दिली माहिती
शनिवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये रिपब्लिकन गव्हर्नर्ससोबत डिनर सुरू असताना ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केली. "लुईझियानाचे गव्हर्नर जेफ लँड्री यांच्या मदतीने आम्ही एक अद्ययावत रुग्णालय जहाज ग्रीनलँडकडे रवाना करत आहोत. तिथल्या आजारी लोकांची काळजी घेण्यासाठी हे जहाज वाटेत आहे," असे ट्रम्प यांनी नमूद केले. मात्र, हे जहाज नेमके कोणत्या आजारावर उपचार करणार आणि ते कुणी मागवले होते, याबाबत अद्याप गुप्तता पाळण्यात आली आहे.
व्हाईट हाऊस आणि संरक्षण विभाग गप्प!
विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर व्हाईट हाऊस किंवा अमेरिकन संरक्षण विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. डेन्मार्क किंवा ग्रीनलँड सरकारने अशा कोणत्याही मदतीची मागणी केली होती का, हे देखील स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेच्या ताफ्यात 'मर्सी' आणि 'कम्फर्ट' ही दोन मोठी रुग्णालय जहाजे आहेत, पण ती सध्या लुईझियानामध्ये तैनात नसल्याने ट्रम्प यांच्या दाव्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
ग्रीनलँड विकत घेण्याची ट्रम्प यांची इच्छा
ग्रीनलँड हा डेन्मार्कचा स्वायत्त भाग आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा ग्रीनलँड विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ग्रीनलँडमधील खनिज संपत्ती आणि त्याचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेता अमेरिका तिथे आपले वर्चस्व निर्माण करू पाहत आहे. अलीकडेच डेन्मार्कच्या राजाने ग्रीनलँडचा दौरा करून एकता दर्शवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ट्रम्प यांनी 'मदतीचा हात' पुढे करत पुन्हा एकदा डेन्मार्कच्या अधिकारांना आव्हान दिल्याचे मानले जात आहे.
नेमके कारण काय?
नुकतीच ग्रीनलँडची राजधानी नूकजवळ एका अमेरिकन पाणबुडीतील एका कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी हलवण्यात आले होते. या घटनेचा आणि ट्रम्प यांच्या या घोषणेचा काही संबंध आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मात्र, मदतीच्या नावाखाली ट्रम्प ग्रीनलँडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आता जोरात सुरू आहे.
Web Summary : Trump offered Greenland a hospital ship, citing illness. Amidst past interest in buying Greenland, this move raises questions about US intentions and challenges Denmark's authority, fueling international speculation.
Web Summary : ट्रम्प ने ग्रीनलैंड को अस्पताल जहाज की पेशकश की, बीमारी का हवाला दिया। ग्रीनलैंड को खरीदने में पिछली रुचि के बीच, यह कदम अमेरिकी इरादों पर सवाल उठाता है और डेनमार्क के अधिकार को चुनौती देता है, जिससे अटकलें तेज हैं।