इस्रायल आणि लेबनॉनमध्ये ३ आठवड्यांचा युद्धविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 14:13 IST2026-04-25T14:13:18+5:302026-04-25T14:13:18+5:30
इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधीचा कालावधी तीन आठवड्यांनी वाढवण्यास दोन्ही देशांनी संमती दर्शवली आहे.

इस्रायल आणि लेबनॉनमध्ये ३ आठवड्यांचा युद्धविराम
वॉशिंग्टन: इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधीचा कालावधी तीन आठवड्यांनी वाढवण्यास दोन्ही देशांनी संमती दर्शवली आहे. गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ही घोषणा केली. एका दशकानंतर दोन्ही देशांमधील ही पहिलीच थेट चर्चा असून, मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश मानले जात आहे. ट्रम्प यांच्या मध्यस्थीने हा युद्धविराम झाला आहे.
ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या या बैठकीत इस्रायल आणि लेबनॉनच्या राजदूतांनी सहभाग घेतला. या आठवड्यातील ही दुसरी भेट होती. ही बैठक अतिशय सकारात्मक झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. यावेळी ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ उपस्थित होते.
हिजबुल्लाचा विरोध
इस्रायल-लेबनॉन यांच्या युद्धविरामाला इराण पुरस्कृत ‘हिजबुल्ला’ या दहशतवादी गटाने विरोध केला आहे. गेल्या शुक्रवारी लागू झालेल्या सुरुवातीच्या युद्धविरामानंतर दोन्ही बाजूंनी अनेकदा नियमांचे उल्लंघन केले आहे. ट्रम्प यांनीही मान्य केले की, दोन्ही देशांना हिजबुल्लाच्या भूमिकेचा विचार करावा लागेल.
इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले
बैरूत: युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही वेळेतच इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या एका मिसाईल लॉन्चरवर हवाई हल्ला केला तर प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाने रॉकेट डागले.
‘नरक’ टिप्पणीमुळे ट्रम्पवर अमेरिकेत हल्लाबोल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनचा उल्लेख 'नरक' (हेलहोल्स) असा केल्याने अमेरिकेत मोठे राजकीय वादळ उठले आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली असून ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाला 'रिअॅलिटी टीव्ही शो' बनवले असून ते सोशल मीडियावर 'वांशिक गरळ' पसरवत असल्याचा आरोप केला आहे. हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटीच्या डेमोक्रॅटिक सदस्यांनी 'एक्स' वर पोस्ट करत, अमेरिकेची जनता अनेक संकटांशी झुंजत असताना राष्ट्राध्यक्ष मात्र वांशिक गरळ ओकत आहेत, असे म्हटले आहे.
भारतीय वंशाच्या खासदारांचा संताप अनावर
या मुद्द्यावर अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना, अमी बेरा, राजा कृष्णमूर्ती यांनी संताप व्यक्त करत आम्हाला भारतीय वंशाचा
अभिमान असून स्थलांतरितांच्या संघर्षाची जाणीव ट्रम्प यांना नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.