हजारो पॅलेस्टाइन नागरिकांचे तांडे उद्ध्वस्त गाझाकडे निघाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 06:19 IST2025-10-12T06:18:47+5:302025-10-12T06:19:49+5:30
युद्धामुळे विस्थापित झालेल्या हजारो कुटुंबांच्या चेहऱ्यांवर आनंदापेक्षा उदास भावना अधिक दिसत होती. गेले दोन वर्षे सततचे बॉम्ब हल्ले व आप्तेष्टांचे मृत्यू प्रत्येक पॅलेस्टाइन नागरिकाने पाहिला होता....

हजारो पॅलेस्टाइन नागरिकांचे तांडे उद्ध्वस्त गाझाकडे निघाले
हमास-इस्रायल शांतता योजना लागू झाल्यानंतर शनिवारी उत्तर व दक्षिणेकडे विस्थापित झालेले हजारो पॅलेस्टाइन नागरिकांचे तांडे गाझा पट्टीकडे वाटचाल करताना दिसले. हातात कपड्यांची बोचकी, तुटकीफुटकी भांडी, लहान मुले घेऊन हजारोंचे तांडे गाझा पट्टीकडे जाताना दिसत होते.
युद्धामुळे विस्थापित झालेल्या हजारो कुटुंबांच्या चेहऱ्यांवर आनंदापेक्षा उदास भावना अधिक दिसत होती. गेले दोन वर्षे सततचे बॉम्ब हल्ले व आप्तेष्टांचे मृत्यू प्रत्येक पॅलेस्टाइन नागरिकाने पाहिला होता. ही दृश्ये आता तरी पाहायला नको, अशा भावना नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या.
गाझा शांतता करारानुसार हमासच्या ताब्यात असलेले २५१ इस्रायली नागरिक तसेच इस्रायलच्या तुरुंगात असलेले दोन हजारांहून अधिक पॅलेस्टाइन नागरिक यांची सुटका लवकरच होण्याची चिन्हे आहेत. मारवान बारघौती या पॅलेस्टाइन नेत्याची सुटका करण्यास इस्रायलने नकार दिला आहे.