अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:29 IST2025-12-03T13:28:46+5:302025-12-03T13:29:34+5:30
तालिबानच्या सर्वोच्च न्यायालयाने एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. फाशी देण्यात आलेला आरोपी, गोळ्या झाडणाऱ्या १३ वर्षीय मुलाच्या कुटुंबीयांच्या हत्येसाठी दोषी आढळला होता.

अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या...
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा अत्यंत क्रूर आणि अमानवीय शिक्षा देण्यात आली आहे. एका १३ वर्षांच्या मुलाने हजारो लोकांच्या उपस्थितीत एका आरोपीला गोळ्या घालून ठार केल्याची घटना घडली आहे. तालिबानने सार्वजनिकरित्या ही फाशीची शिक्षा दिली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तालिबानच्या सर्वोच्च न्यायालयाने एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. फाशी देण्यात आलेला आरोपी, गोळ्या झाडणाऱ्या १३ वर्षीय मुलाच्या कुटुंबीयांच्या हत्येसाठी दोषी आढळला होता. तालिबानच्या सर्वोच्च नेत्याने फाशीला मंजुरी दिल्यानंतर, आरोपीला मारण्याचे काम पीडित कुटुंबातील १३ वर्षीय मुलाला देण्यात आले. परंतू, तत्पूर्वी दोषी व्यक्तीला माफी द्यायची आहे का, असे तालिबानी अधिकाऱ्यांनी त्या मुलाला विचारले होते. मुलाने माफ करण्यास नकार दिला होता. त्यानंतर तालिबानी अधिकाऱ्यांनी मुलाच्या हातात बंदूक दिली आणि आरोपीला गोळ्या मारण्यास सांगितले.
धक्कादायक म्हणजे एका स्टेडिअममध्ये ही शिक्षा देण्यात आली. हे पाहण्यासाठी सुमारे ८० हजार लोक यासाठी उपस्थित होते. तालिबानी अधिकाऱ्यांनी नागरिकांना ही शिक्षा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बोलविले होते. त्यासाठी सूचना प्रसारित करण्यात आल्या होत्या. मुलाने गोळ्या झाडताच, स्टेडियममध्ये धार्मिक घोषणांचा आवाज घुमला होता.