जिवंत लोकांचे फोटो काढू नका; तालिबानचे अजब फर्मान, कारणही एकदम भन्नाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 15:25 IST2024-02-19T15:24:33+5:302024-02-19T15:25:05+5:30
अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने एक नवीन फर्मान काढले आहे.

जिवंत लोकांचे फोटो काढू नका; तालिबानचे अजब फर्मान, कारणही एकदम भन्नाट
अफगाणिस्तानमधीलतालिबान सरकारने एक नवीन फर्मान काढले आहे. तालिबानने अनेकदा महिला आणि अल्पसंख्याकांवर निर्बंध लादणारे आदेश दिले आहेत. आता त्यांनी एक अनोखा आदेश जारी केला आहे. तालिबानने नव्या आदेशानुसार, जिवंत लोक आणि प्राण्यांचे फोटो काढण्यास बंदी घातली आहे. लष्करातील अधिकाऱ्यांसह सर्वांना आदेश जारी करताना, कंदाहारमधील तालिबान सरकारने म्हटले की, जिवंत लोक आणि प्राण्यांचे फोटो काढणे चुकीचे आहे. जर कोणी हे कृत्य करताना आढळल्यास त्याला आळा घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरं तर तालिबानची सुरूवातच कंदाहार या शहरातूनच झाली होती. २०२१ मध्ये अमेरिकेच्या प्रस्थानानंतर या कट्टरतावादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये स्वतःचे सरकार स्थापन केले.
तालिबानने एक पत्रक जारी करून हे फर्मान काढले. तालिबानने जारी केलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे की, जिवंत लोकांचे फोटो काढल्यास त्यांचे इतर वस्तूंच्या तुलनेत अधिक नुकसान होते. अशा परिस्थितीत कोणत्याही औपचारिक किंवा अनौपचारिक परिषद, बैठक किंवा कार्यक्रमात लोकांचे फोटो काढू नयेत. फोटो काढल्यामुळे निर्जीव वस्तूंपेक्षा जास्त नुकसान होते. हा नियम सरकारी कार्यक्रमांनाही लागू होणार असून कोणत्याही सभेत फोटो काढले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
तालिबानचे अजब फर्मान जारी
दरम्यान, अनोखा आदेश जारी करताना तालिबानने इस्लामिक कलेत मानव आणि प्राण्यांचे फोटो काढण्यास मनाई असल्याचा तर्क दिला आहे. याबाबत कंदाहारच्या राज्यपालांच्या प्रवक्त्याला विचारले असता, तसा आदेश जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे फक्त सरकारी अधिकाऱ्यांनाच लागू होईल. प्रवक्ते महमूद आझम म्हणाले, "हा निर्णय सामान्य लोक आणि स्वतंत्र माध्यमांसाठी नाही". खरं तर याआधीही १९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. तेव्हा देखील कट्टरपंथी इस्लामिक संघटनेने जिवंत लोकांचे फोटो काढणे आणि व्हिडीओ बनवणे यावर बंदी घातली होती.
तालिबानने मीडिया संस्थानांना देखील रोखले आहे. अडीच वर्षांपूर्वी सत्तेत परतल्यानंतर तालिबानने अनेक मीडिया संस्थांना जिवंत लोकांचे फोटो प्रसारित करण्यापासून रोखले आहे. मात्र, तालिबानचे उच्च अधिकारी स्वत: इतर देशांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीचे फोटो शेअर करत असतात.